AUS vs NZ: रॉस टेलर याची ऐतिहासिक खेळी, स्टीफन फ्लेमिंग याला पछाडत बनला न्यूझीलंडचा सर्वाधिक टेस्ट धावा करणारा फलंदाज
रॉस टेलर (Photo Credit: Getty Images)

अनुभवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) याने सोमवारी कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड (New Zealand) कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकात आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टेलरने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) याला मागे टाकले. फ्लेमिंगने 111 कसोटी सामन्यांमध्ये 40.06 च्या सरासरीने 7 शतक आणि 46 अर्धशतकांसह 7172 धावा केल्या, तर आपली 100 वी कसोटी खेळत असलेल्या टेलरने दुसर्‍या डावाच्या 18 व्या षटकात न्यूझीलंडच्या सर्वात यशस्वी कर्णधाराच्या पुढे गेला. पण टेलरने हा विक्रम गाठल्यावर 19 व्या षटकात पॅट कमिन्स (Pat Cummins) याने त्याला माघारी धाडले. टेलरने केवळ 5 चेंडूत 22 धावा केल्या. ब्लॅक कॅप्ससाठी 35-वर्षीय टेलर आता 100 कसोटी सामन्यात 19 शतकं आणि 33 अर्धशतकांसह 46.28 च्या सरासरीने 7174 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) 6453 धावाांसह तिसर्‍या स्थानावर असून सध्याचा कर्णधार केन विल्यमसन 6379 धावांसह चौथ्या आणि मार्टिन क्रो 5444 धावांसह पाचव्या स्थानावर आहेत. (AUS vs NZ: मार्नस लाबूशेन याच्या बॅकसविंग शॉटचे वर्णन करताना मार्क वॉ यांनी कॉमेंट्री करताना वापरला C**K शब्द, नंतर मागितली माफी)

"278 न्यूझीलंड कसोटी क्रिकेटर. टेलर आपल्यास पर्वताच्या शिखरावर बसण्यास पात्र आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटींग महानतेमधील तुझे स्थान निश्चित आहे. आश्चर्यकारक कर्तृत्वाबद्दल अभिनंदन," टेलरने या रेकॉर्डची नोंद केल्यावर मॅक्युलमने लगेच ट्विट केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, किवी संघ तिसरा सामना गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. सिडनीमधील तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 217 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 416 धावांचे आव्हान ठेवले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने शतक ठोकले. वॉर्नर 111 धावांवर नाबाद परतला. मार्नस लाबूशेन 59 धावांवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या घरच्या पाच कसोटी कसोटी सामन्यात वॉर्नरने 131 च्या सरासरीने 786 धावा तर लाबूशेनने 112 च्या सरासरीने 896 धावा केल्या. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने पर्थमधील डे-नाईट पहिला कसोटी सामना 299 धावांनी जिंकला होता तर मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात 247 धावांनी विजय मिळविला होता.