Asia Cup 2020: आशिया कप आयोजनाबाबत संभ्रम कायम, ACC च्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय नाही
विराट कोहली आणि सरफराज अहमद (Photo Credit: Getty Images)

करोना व्हायरसचा (Coronavirus) फटका अन्य क्षेत्रांप्रमाणे क्रीडाविश्वालाही बसला असून आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप 2020, या दोन्ही स्पर्धांचे आयोजन होणार की नाही? झाल्यास कधी होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पण, या दोन स्पर्धनाऐवजी आणखीन एक स्पर्धा आहे ज्याच्या आयोजनावर सस्पेन्स अजूनही कायम आहे आणि ती म्हणजे... आशिया कप! (Asia Cup) आशिया कपच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने सोमवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asia Cricket Council) सदस्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत आशिया कप स्पर्धेसंबंधी चर्चा झाली, पण या चर्चेतून कोणताही अंतिम निर्णय घेता आला नाही. त्यामुळे आता याच महिन्यात काही दिवसांनी पुन्हा एकदा या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह देखील या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान, यंदा पाकिस्तान (Pakistan) बोर्डाकडे या स्पर्धेचे यजमान आहेत. (IPL च्या आयोजनासाठी आशिया कपच्या कार्यक्रमामध्ये होणार बदल? PCB चे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी दिले स्पष्टीकरण)

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून भारत सरकारने आपले खेळाडू पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा यंदा तटस्थ ठिकाणी, युएईमध्ये आयोजित केली जाण्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पीसीबीने या स्पर्धेचे आयोजन आपल्याच देशात आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु भारत पाकिस्तानमध्ये खेळणार नाही या वस्तुस्थितीने पीसीबीला तटस्थ ठिकाण शोधण्यासाठी भाग पाडले आहे. पण, करोनाच्या तडाख्यातून अद्याप अनेक देश सावरू शकलेले नाहीत, अशा परिस्थितीत आशिया चषकाचे आयोजन करावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. “कोविड-19 चे प्रभाव आणि परिणाम लक्षात घेता आशिया चषक 2020 साठी संभाव्य जागेच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली आणि अंतिम निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल,” असे एसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि टी-20 वर्ल्ड कपबाबत गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा झाली असून यावर्षी यापैकी फक्त एक स्पर्धा शक्य होईल अशी परिस्थिती दर्शवित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलची (आयसीसी) बैठक 10 जून रोजी होणार आहे, त्यानंतर दोन्ही स्पर्धांच्या भविष्य स्पष्ट होईल.