Photo Credit - Twitter

भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने (West Zone) दुलीप करंडक स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा (South Zone) 294 धावांनी पराभव केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिणेने पहिल्या डावात 327 धावा केल्या. पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 4 बाद 585 अशी डोंगरी धावसंख्या उभारली. दक्षिण संघाला सामना जिंकण्यासाठी 529 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु दुसऱ्या डावात त्यांना केवळ 234 धावाच करता आल्या. 19व्यांदा दुलीप करंडक जिंकण्यात पश्चिम विभागाचा संघ यशस्वी ठरला. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वाल (265), सर्फराज खान (127) आणि हेत पटेल (नाबाद 51) यांच्या शानदार खेळीच्या बळावर पश्चिम विभागाने दुसरा डाव चार गडी गमावून 585 धावांवर घोषित केला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण विभागाच्या 6 गडी गमावून 154 धावा झाल्या होत्या. पाचव्या दिवशी संघाला स्कोअरमध्ये केवळ 80 धावांची भर घालता आली.

चौथ्या दिवशी, आर साई किशोर 8 धावा करून क्रीजवर उपस्थित होता आणि रवी तेजा यष्टीमागे होता. पाचव्या दिवशी साई किशोरच्या रूपाने पश्चिमेला विभागाला पहिले यश मिळाले. चिंतन गजाने किशोरला प्रियांक पांचाळवी झेलबाद केले. साई किशोरने सात धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ रवी तेजाही बाद झाला. शम्स मुलाणीने त्याला एलबीडब्ल्यू केले. रवी तेजाने 97 चेंडूत 53 धावा केल्या. अखेरच्या दिवशी त्यांनी संघर्ष केला, पण तो संघासाठी पुरेसा ठरला नाही. (हे देखील वाचा: India vs Australia, 2nd T20I सामन्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक Rahul Dravid ने केलेल्या 'या' कृतीने जिंकली सार्‍यांची मनं!)

मुलानीने रवी तेजानंतर बेसिल थम्पीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. खाते न उघडता थम्पीने सरफराज खानकडे झेल दिला. शेवटची विकेट म्हणून कृष्णप्पा गौतम बाद झाला. गौतमने 28 चेंडूत 17 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. गौतमला तनुष कोटियनने जयदेव उनाडकटच्या हाती झेलबाद केले. दक्षिणेकडून सलामीवीर रोहन कुन्नम्मलने दुसऱ्या डावात 93 धावा केल्या. पश्चिमेकडून शम्स मुलानीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय जयदेव उनाडकट आणि अतित सेठ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.