इतर अनेक क्रिकेटर्सप्रमाणेच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही (Ajinkya Rahane) लॉकडाऊन दरम्यान मंगळवारी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाउनमुळे अनेक क्रिकेट मालिका/स्पर्धा रद्द झाल्या असल्याने सध्या क्रिकेटपटू आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहे. बरेच खेळाडू हा वेळ त्यांच्या प्रशंसकांशी प्रश्नोत्तर सत्राद्वारे सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी वापरत आहेत. आणि अजिंक्य रहाणेचा काल यात समावेश झाला. त्याने आपल्या चाहत्यांना ‘AskAjinkya’ हॅशटॅगखाली इच्छित असलेला कोणताही प्रश्न विचारण्यास सांगितले. यावर एका चाहत्याने त्याला त्याची सर्वात आवडती इनिंग्सबद्दल विचारले. यात रहाणेने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 103 धावांचा डाव आणि 2015 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 79 धावांच्या डावाचा उल्लेख केला. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणे गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांच्या संघात खेळला नाही. (महाराष्ट्र: लॉकडाउन काळात गरीबांना शेतातील केळी देण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तुळजापूरच्या शेतकऱ्याचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक)
रहाणेने इंग्लंडविरुद्ध 2014 मध्ये 154 चेंडूत 103 धावांचा शानदार डाव खेळला. भारतीय फलंदाज जेम्स अँडरसनसमोर झगडत असताना रहाणेने धैर्य दाखवत जोरदार डाव खेळला. रहाणेचा डाव खूप खास होता आणि त्यामुळेच टीम इंडियाने 28 वर्षांत पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळविला. या खास खेळीच्या एका वर्षानंतर रहाणेने 2015 च्या विश्वचषकात शिखर धवनसह दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 125 धावांची भागीदारी केली. या दरम्यान, त्याने 60 चेंडूत 79 धावांची तडफदार खेळी केली होती. धवन आणि रहाणेच्या जोरावर भारताने 307 धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. नंतर आर अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आफ्रिकेला 177 धावांवर ऑलआऊट केले आणि एकतर्फी शैलीने विजय मिळविला.
दुसरीकडे, एका चाहत्याने रहाणेला प्रश्न विचारला की तो क्वारंटाइनच्या काळात काय करतो? सकाळी 5 वाजता उठणे, वाचन करणे, कसरत, आपल्या मुलीबरोबर खेळणे आणि पत्नीला मदत करणे आणि इतर बर्याच गोष्टींचा समावेश असे त्याचे संपूर्ण वेळापत्रक असल्याचे सांगितले.