अजिंक्य रहाणे (Photo Credit: Getty Images)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसची (Coronavirus) स्थिती गंभीर बनलेली आहे. अद्याप राज्यात 400 हुन अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून 21 दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून काही दिवसात आता ते संपुष्टात येईल. 14 एप्रिल रोजी लॉकडाउन संपुष्टात येईल. या दरम्यान अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जमा होण्याची मनाई केली असून सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान होत आहे. अशाच एका शेतकऱ्याच्या मदतीसाठी टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सरसावला आहे. राहणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेल्याचं आपण पाहिलेही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य लोकांप्रमाणे रहाणेनेही यापूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारला 10 लाखांची मदत जाहीर केली होती. (BCCI आणि सरकारने क्रिकेटप्रेमींसाठी केली मोठी घोषणा, लॉकडाउनमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार 'हे' रोमांचक सामने)

आणि आता त्याने महाराष्ट्राच्या तुळजापूर येथील एके शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करून त्याचे कौतुक केले आहे. या व्हिडिओद्वारे त्या शेतकऱ्याने आपल्या केळीच्या शेतातील केळी गरीबांना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारने शेतातील केळी गरीबांसाठी घेऊन जावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. "मी गरीब शेतकरी मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण मी अशी मदत नक्कीच करू इच्छितो," असं म्हणतं त्यामी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याच्या उदात्त भावनेचे कौतुक केले.

कोरोनाविरोधात एकत्र येत देशातील अनेक क्रीडापटुंनी राज्य आणि केंद्र सरकारला मदत जाहीर केली आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पीव्ही सिंधू, रोहित शर्मा, मेरी कॉम, सायना नेहवाल, बजरंग पुनियासह अन्य दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.