ZIM vs IRE (Photo Cedit - X)

ZIM vs IRE: झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात (ZIM vs IRE 1st Test 2025) एक अनोखा दृश्य पाहायला मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूला झिम्बाब्वेने कर्णधार म्हणून नियुक्त केले आणि मैदानात पाठवले. या खेळाडूचे नाव जोनाथन कॅम्पबेल (Johnathan Campbell) आहे. झिम्बाब्वेचा नियमित कर्णधार क्रेग एर्विनने वैयक्तिक कारणांमुळे शेवटच्या क्षणी कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर कॅम्पबेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कॅम्पबेलचे वडील अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल यांनीही झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले आणि 60 कसोटी आणि 188 एकदिवसीय सामने खेळले. (हे देखील वाचा: Zimbabwe vs Ireland, Only Test Day 1 Scorecard: आयर्लंडचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला, मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राइन यांनी झळकावली अर्धशतके; येथ पाहा स्कोअरकार्ड)

पदार्पणातच मिळाले संघाचे कर्णधारपद

27 वर्षीय जोनाथन कॅम्पबेल आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणार होता. तथापि, नियमित कर्णधार क्रेग एर्विनने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटी सामन्यातून माघार घेतली. यानंतर, झिम्बाब्वे संघाने एक निवेदन जारी करून कॅम्पबेलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली. झिम्बाब्वे क्रिकेटने म्हटले आहे की, “नियमित कर्णधार क्रेग एर्विनने कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे आयर्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा जोनाथन कॅम्पबेल या सामन्यात संघाचे नेतृत्व करताना दिसेल. "देशांतर्गत पातळीवर संघाचे मोठ्या प्रमाणात नेतृत्व करणारा कॅम्पबेल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि संघात भरपूर ऊर्जा आणतो."

जोनाथनने झिम्बाब्वेकडून 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने मे 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये कॅम्पबेलने 121 च्या स्ट्राईक रेटने 123 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, जोनाथनने 34 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 1913 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

वडिलांनीही केले संघाचे नेतृत्व

जोनाथन कॅम्पबेलच्या वडिलांनीही झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले आहे. जोनाथनचे वडील अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल यांनी संघासाठी एकूण 60 कसोटी आणि 188 एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्यांनी संघाची जबाबदारीही सांभाळली. पदार्पणातच झिम्बाब्वेचे नेतृत्व करणारा कॅम्पबेल हा दुसराच खेळाडू ठरला. त्याच्या आधी डेव्ह हॉटनने 1992 मध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ही कामगिरी केली होती. गेल्या 50 वर्षांत ही अनोखी कामगिरी करणारा कॅम्पबेल हा फक्त तिसरा खेळाडू आहे.