ICC Cricket World Cup 2019: सध्या सर्वत्र वर्ल्डकपचे वारे वाहत आहे. यामध्ये भारताची चांगलीच घोडदौड चालू आहे. अशात क्रिकेटचा देव 'सचिन तेंडूलकर' (Sachin Tendulkar) याने 1983 च्या विश्वकप स्पर्धेची आठवण ताजा केली आहे. सचिन तेंडूलकरने सुनील गावसकर (Sunil Gavaskar)सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच लॉर्डस् मैदानावर क्लिक केला आहे जिथे भारताने याच दिवशी विश्वचषकाचा सामना जिंकला होता. शनिवार, 25 जून 1983 रोजी भारताने वेस्ट इंडीजचा पराभव करत प्रथमच वर्ल्डकप (World Cup 1983) जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. कपिलदेव यांच्या कॅप्टन्सीखाली भारतीय संघ खेळला होता.
1975 आणि 1979 च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकार्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्यात. मात्र 25 जूनचा दिवस हा फारच ऐतिहासिक ठरला आणि लॉर्डस् मैदानावर भारताने तो सामना जिंकत इतिहास घडवला. भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मदनलाल, अमरनाथ, संधू या गोलंदाजांची कामगिरी मोलाची ठरली.
दरम्यान, भारत आपला पुढचा सामना 27 जून रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध खेळणार आहे. यावेळीच्या विश्वचषकामध्ये भारत संघ विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वात प्रबळ संघ मानला जात आहे. आता भारत विश्वकरंडक स्पर्धा जिंकू शकतो का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.