जेमिमाह रॉड्रिग्ज (Photo Credit: Getty)

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला सुपर लीगमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने नाबाद शतक ठोकले. 18 वर्षीय रॉड्रिग्सने अवघ्या 58 चेंडूत 17 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 112 धावा केल्या. आणि यासह रॉड्रिग्जने किया महिला सुपर लीग टी-20 लीग (Kia Super League) मध्ये जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. तिच्या शतकी खेळीच्या जोरावर यॉर्कशायर डायमंड्स (Yorkshire Diamonds) संघाने शेवटच्या बॉलवर सदर्न वायपर्स (Southern Vipers) संघाचा चार गडी राखून पराभव केला. वायपर्सने प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित 20 ओव्हरमध्ये चार गडी गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल यॉर्कशायरने अंतिम चेंडूवर 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. जेमीमहला तिच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

दरम्यान, परदेशी टी-20 लीगमधील भारतीय महिला खेळाडूची ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी हा विक्रम भारतीय महिला संघाची स्फोटक सलामीवीर स्मृती मंधाना हिच्या नाव होता. मागील वर्षी किआ सुपर लीगमध्ये मंधानाने शतक केले होते. शिवाय, स्मृती मंधानानंतर या लीगमध्ये शतक झळकावणारी जेमिमाह ही दुसरी परदेशी खेळाडू बनली आहे. जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या डावात 17 चौकार आणि एक षटकार लगावला.

जेमिमाहने या स्पर्धेत आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 341 धावा केल्या आहेत. तिने 56.83 च्या सरासरीने आणि 141.49 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. सध्याच्या मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यातील ती दुसर्‍या क्रमांकावर आहे.