Sharad Pawar's NCPs First List Of Candidates: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव बागरे, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून  नीलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी (MVA) अंतर्गत पक्षाला 10 जागा मिळतील आणि लवकरच सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत शुक्रवारी बैठक झाली असून या बैठकीत लोकसभेच्या 10 जागांवर चर्चा करण्यात आली. आज जाहीर झालेली ही पहिली यादी असून दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत पवार गटाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार गटाच्या यादीत साताऱ्याची जागा जाहीर झालेली नाही. श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याठिकाणी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा केली. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)