लवकरच मुंबईकरांना (Mumbai) कमी किमतीमध्ये आरोग्य उपचार व सुविधा उपलब्ध होणार आहेत. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर्स' (Hinduhridayasamrat Balasaheb Thackeray Health Centres) या नावाने ओळखल्या जाणार्‍या पॉलीक्लिनिकची संकल्पना 15 ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने ही अंतिम मुदत दिली आहे. या संकल्पनेचा उद्देश आसपासच्या रूग्णांना उपचार प्रदान करणे आहे. या शिवाय याठिकाणी प्रत्येक विभागातील विशेष डॉक्टर आणि तज्ञ सेवेसाठी उपलब्ध असतील.

अधिका-यांनी सांगितले की, हे दवाखाने झोपडपट्टी भागात सुरू केले जातील आणि यामुळे इतर अनेक रुग्णालयांवरील भार कमी होईल. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले की, हे दवाखाने थेट लोकांशी जोडले जातील आणि संपूर्ण शहरात 70 दवाखाने उभारण्याची त्यांची योजना आहे. हे दवाखाने उभा करण्यासाठी काही जागांची निवड केली आहे, जिथे क्लिनिकमध्ये रूपांतर केलेले कंटेनर उभे केली जातील.

त्यासोबतच सध्याचे दवाखाने-प्राथमिक आरोग्य केंद्रांचेही 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकमध्ये रूपांतर केले जाईल. गोमारे यांनी सांगितले की, ‘किमान 10 ते 15 एचबीटी क्लिनिक आणि 13 पॉलीक्लिनिक सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना मिळेल आणि लोकांना कमी खर्चात किंवा अगदी मोफत आरोग्य सुविधा मिळतील.’

प्राथमिक स्तरावर शहराच्या आरोग्य सेवेला चालना देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पावरील भांडवली खर्चासाठी 250 कोटी रुपये आणि महसुली खर्चासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एचबीटी क्लिनिक सामान्य आजार हाताळेल, परंतु जर समस्या थोडी गंभीर असेल आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ इत्यादी तज्ञांची आवश्यकता असेल तर रुग्णांना जवळच्या एचबीटी पॉलीक्लिनिकमध्ये पाठवले जाईल. (हेही वाचा: Mumbai Waterlogging: मुंबईतील चेंबुर परिसरात सकल भागात साचले पाणी, मुसळधार पावसाचा जोर सुरुच)

पॉलीक्लिनिक्स सध्या फिजिओथेरपिस्टसह ईएनती विशेषज्ञ, नेत्ररोगतज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, सामान्य चिकित्सक, अस्थिव्यंग आणि त्वचाविज्ञानी यांची नियुक्ती करण्यास उत्सुक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)