घटना आहे अमेरिकेतील. उटा परिसरातील. इथे मासे चक्क आकाशातून उडत येत तलावात पडत असल्याचे पहायला मिळाले. काहींनी या प्रकाराचे वर्णन माशांचा पाऊस असे केले. 'डीव्हिजन ऑफ वाईल्ड लाईफ रिसोर्सेस'ने या मजेशीर प्रकाराचे चित्रिकरण केले. तसेच, हा व्हिडिओ सोशल मीडियात (फेसबुक) शेअर केला. हा व्हिडिओ आता भलताच व्हायरल झाला आहे. कसा घडला नेमका प्रकार...
असे कसे घडले?
हा प्रकार उटा येथील तलावात विमानातून मासे सोडल्याने घडला. त्याचे झाले असे, विमानातील दरवाजातून मोठ्या प्रमाणावर मासे उंच आकाशातून तलावात सोडण्यात आले. त्यामुळे हे मासे हवेत उडताना किंवा माशांचा पाऊस पडत असल्यासारखे दिसत होते. 'डिव्हिजन ऑफ वाइल्ड लाईफ रिसोर्सेस'ने फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओखाली दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही उटाच्या तलावात माशांचा पाऊस पडताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका'.
...म्हणून पडला माशांचा पाऊस!
उंचावर असलेल्या या तलावात माशांची कमी होती. इतकी, की तलावात मासेच नव्हते. त्यामुळे ही कमी दूर करण्यासाठी छोट्या-छोट्या आकाराचे सुमारे १-३ इंच लांबीचे मासे विमानाच्या माध्यमातून तलावात सोडण्यात आले. हे मासे विमानातून सोडण्यात आले कारण, एकतर हा तलाव उंचावर आहे. दुसरे म्हणजे, हा अगदीच रिमोट एरिया आहे. त्यामुळे इथे मानवी वर्दळ फारशी नाही. त्यामुळे रस्ते किंवा इथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपब्ध नाही. जमीनीवर मासे वाहून आणाये तर, त्यांच्या जगण्याची शक्यता मावळते. त्यामुळे माशांची हवाई मार्गे वाहतूक करून ते तळ्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, हवाई मार्गे तलावात सोडलेल्या माशांपैकी सुमारे ९५ टक्के मासे हे जिवंत असल्याचे उटा वाईल्ड लाईफ रिसोर्सेसने म्हटले आहे.