Mucormycosis | (File Image)

भारत सध्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेचा सामना करत असताना सोशल मीडियावर (Social Media) खोट्या माहिती (Fake News) प्रसार वाढला आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप, ट्वीटर सारख्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोणतीही माहिती, सुत्रे न तपासता थेट अनेक खोटे, खळबळजनक दावे शेअर केले जात आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, संपूर्ण देश कोरोना संकटाला तोंड देत असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. याच आजारासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात म्युकरमायकोसिस सारख्या आजारांवर मात करण्यासाठी घरगुती उपाय सांगितला जात आहे. पीआयबीने या व्हायरल व्हिडिओमागील सत्य शोधून काढले आहे. तर, या व्हिडिओमागील सत्य जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात बोलत आहे. या व्हिडिओनुसार, डॉ. परमेश्वर आरोडा असे त्या व्यक्तीचे असल्याचे समजत आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती सांगत आहे की, तुरटी, हळद, खडी मीठ आणि मोहरीच्या तेलाने मिश्रण करून तोंडातील आतील भागास लावले तर, म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला टाळता येऊ शकते. परंतु, हा दावा खोटा असून याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये. तसे कोणत्याही गंभीर आजारावर घरगुती उपचार करू नका, असेही आवाहन पीआयबीने केले आहे. हे देखील वाचा- Fact Check: खोट्या माहितीचे खंडन करणाऱ्या 'पीआयबी फॅक्ट चेक'च्या नावाने बनवली खोटी वेबसाइट; लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन

ट्विट-

भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळाली होती. ज्यात मृत्युचे प्रमाणही वाढले होते. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. ही अतिशय दिलासादायक बाब आहे. परंतु, देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी सरकारासह प्रशासन अधिक खबरदारी घेत आहेत. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन सरकारकडून केले जात आहे.