Parle G Rumors: बिहार मध्ये पार्ले जी बिस्किटाविषयी पसरली अजब अफवा; दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
Parle G biscuit (Photo Credits: Twitter)

कधी काय अफवा उठेल आणि लोक त्याला बळी पडतील, याचा अंदाज बांधता येत नाही. पार्ले जी बिस्किटाविषयी अशीच एक अफवा बिहारच्या सीतामढ़ी मध्ये उठली आहे. पार्ले जी बिस्किटला जितिया पर्वशी जोडून एक अफवा पसरवली जात आहे. घरात असलेल्या सर्व मुलांनी पार्ले जी  बिस्किट खायचं आहे. अन्यथा त्यांच्यासोबत वाईट घटना होऊ शकते, अशी अफवा आहे. विशेष म्हणजे ही अफवा इतक्या वेगाने पसरत आहे की, त्यामुळे किराणा दुकानांबाहेर पार्ले जी बिस्किट खरेदीसाठी मोठी रांग लागली आहे.

आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि सुखी जीवनासाठी माता जितिया पर्वानिमित्त व्रत करतात. या पर्व काळात ही अफवा पसरल्याने सर्व मातांनी ही गोष्ट अगदी गंभीरतेने घेतली आणि त्यामुळे पार्ले जी बिस्किट खरेदीसाठी दुकांनाबाहेर गर्दी झाली. अफवेचे भय इतके तीव्र होते की, पार्ले जी बिस्किटाचा स्टॉक संपला. (लॉकडाऊन काळात Parle-G बिस्किटची 8 दशकांतील सर्वाधिक विक्री; नेटिझन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून निर्मात्यांवर कौतुकाचा वर्षाव)

सीतामढ़ी जिल्ह्यातील बैरगनिया, ढेंग, नानपुर, डुमरा, बाजपट्टी, मेजरगंज समवेत अनेक भागांत ही अफवा पसरली असून लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ही अफवा कशी, कुठून आणि कोणी पसरवली याबद्दल अद्याप काही कळू शकलेले नाही. परंतु, या अफवेमुळे बिस्किटांची खरेदी अचानक वाढली. गुरुवारी अगदी रात्रीपर्यंत लोक पार्ले जी बिस्किट खरेदी करत होते. बिस्किट खरेदी विषयी लोकांना विचारले असता त्यांनी बिस्किट न खाल्यास मुलांसोबत काहीतरी अघटीत घडेल, असे सांगितले. तर सर्वजण केवल पार्ले जी बिस्किट खरेदी करत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे.