गुजरात मधील माधवपूर गावातून सिंहाची भरधाव रपेट; पहा Viral Video
वाघाची भररस्त्यातून भरधाव रपेट (Photo Credits: Twitter)

जंगलाचा राजा सिंह या प्राण्याला पाहण्यासाठी आपण जितके उत्सुक असतो तितकीच किंवा त्याहूनही जास्तच त्याची दहशत आहे. रहिवासी परिसरात वाघ दिसताच अनेकांची घाबरगुंडी उडते. यापूर्वी इमारती, मॉल्स इत्यादी रहदारीच्या ठिकाणी वाघ शिरल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र रस्त्यात उभे असताना अचानक सिंह रस्त्यातून धावत गेला तर..? कधी विचार केलाय? अशीच एक घटना गुजरात (Gujarat) मधील एका गावात घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सिंह रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. अचानक आलेल्या सिंहाला पाहून रस्त्यावरील लोकांचा श्वास एक क्षण थांबलाच असेल. गुजरात मधील माधवपूर गावातील (Madhavpur Village) ही घटना असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (ऑस्ट्रेलिया: सापाने गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी कसा काढला, पहा व्हायरल व्हिडिओ)

हा घाबरगुंडी उडवणारा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, "कल्पना करा... जेव्हा वाघ 80 किमी वेगाने धावत रस्त्यावर येईल..."

पहा व्हिडिओ:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक प्रतिक्रीया देखील येत आहेत. यात कोणाला सिंहाची काळजी आहे तर कोणला माणसांची. व्हिडिओवरील कमेंट्समध्ये कोणी सिंह सुरक्षित आहे का, असं विचारतंय. तर कोणी रस्त्यावरील माणसांना कोणतीही दुखापत झाली नाही ना, याची चौकशी करतंय.

गुजरातमधील माधवपूर गावात काही लोकांच्या समूहापासून एक सिंह भरधाव वेगाने धावत जाताना दिसत आहे. त्याला पाहून लोक इकडे तिकडे पळू लागतात. व्हिडिओत ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. मात्र या सर्व गडबडीत सुदैवाने सिंहाने कोणावरही हल्ला केला नाही. तसंच धावपळीत कोणालाही दुखापत झाली नाही.