सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सेलेब्रिटी आणि त्यांचे चाहते यांमधील अंतर फार कमी झाले आहे. इंस्टाग्राम (Instagram) च्या व्यासपीठाद्वारे तर आज काल सेलेब्जचे वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांसमोर उभे राहिले आहे. जगात असे अनेक सेलेब्ज आहे ज्यांचे इंस्टाग्राम कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे, इंस्टाग्राम वरील प्रत्येक पोस्टद्वारे हे सेलेब्ज कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरे आहे. नुकतेच Hooper HQ या यूकेच्या सोशल मीडिया व्यवस्थापन कंपनीने इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत सेलेब्जची यादी (Instagram Rich List 2020) जाहीर केली आहे. या यादीमध्ये अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) पहिल्या क्रमांकावर आहे. ड्वेन इन्स्टावरील एका पोस्टसाठी 1,015,000 डॉलर म्हणजे जवळजवळ 7.4 कोटी रुपये घेतो.
ड्वेननंतर पहिला 5 मध्ये कायली जेनर, क्रिस्टियानो रोनाल्डो, किम कर्दाशिअन आणि एरियाना ग्रँड यांचा समावेश आहे. या सर्वांची कमाई प्रत्येक पोस्टमागे 6 कोटीपेक्षा जास्त आहे. पहिल्या दहा मध्ये बियॉन्से, जस्टिन बीबर, टेलर स्विफ्ट अशा प्रसिद्ध गायकांचा समावेश आहे. संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ड्वेन जॉनसनचे इन्स्टाग्रामवर ‘द रॉक’ नावाने खाते आहे आणि त्याचे 188 मिलियन फॉलोअर्स आहेत. यंदा जॉन्सनची कमाई 15 टक्क्यांनी वाढली आहे, तर काइली जेनरच्या कमाईत 22 टक्क्यांची घट नोंदविली आहे. (हेही वाचा: 'ऑस्कर्स अवॉर्ड्स 2021' मध्ये मतदानासाठी 819 पाहुण्यांची यादी जाहीर; भारतामधील हृतिक रोशन, आलिया भट्ट यांचा समावेश)
या यादीमधील पहिल्या 50 सेलेब्जमध्ये भारतामधील फक्त दोघांचा समावेश आहे, ते म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि विराट कोहली ( Virat Kohli). 26 नंबरवर असलेला विराट एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी साधारण 2 कोटी 21 लाख रुपये घेतो. तर 28 नंबरवर असलेली प्रियंका एका पोस्टसाठी 2 कोटी 16 लाख रुपये घेते. अशाप्रकारे कलाकारांच्या चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त कमाई हे सेलेब्ज इन्स्टाग्राम मार्फत करत आहेत.
दरम्यान, फोर्ब्सच्या वृत्तानुसार, जॉन्सनने जुमांजी: द नेक्स्ट लेव्हल (Jumanji: The Next Level) मधील त्याच्या भूमिकेसाठी 23 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती तसेच त्याने एकूण नफ्यातील 15% कमाई घेतली होती.