Helicopter Puja Viral Video: देवाच्या दारात हेलिकॉप्टरची पूजा, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव यांचीही उपस्थिती (पाहा व्हिडिओ)
Helicopter Puja | (PC - Twitter/ians_india)

दुचाकी किंवा चारचाकी वाहान घेतल्यावर त्याची विधीवत पूजा करण्यासाठी ते मंदिरात घेऊन जाणे किंवा देवासमोर त्याची पूजा (Vahan Puja Vidhi) करणे ही अगदीच सामान्य बाब आहे. आपल्यापैकी अनेकांनी ती केली केली असेल. पण, तेलंगणातील एका व्यवसायिकाने मात्र चक्क हेलिकॉप्टरच देवाच्या दारात नेऊन त्याची पूजा (Helicopter Puja) केली आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेने या दृश्याचा व्हिडिओ सामायिक केला आहे. व्हिडिओ पाहून अनेक लोक विस्मयचकीत झाले आहेत. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. उल्लेखनिय असे की, पूजा विधी सुरु असताना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव हे देखील उपस्थित होते.

बोईनपल्ली श्रीनिवास राव (Boinpally Srinivas Rao) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. राव हे प्रथमा ग्रुपचे ( Prathima Group) मालक आहेत. राव यांनी नुकतेच एक हेलिकॉप्टर (ACH-135) खरेदी केले. हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर नव्या कोऱ्या हेलिकॉप्टरमधून ते चक्क हैदराबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या यदाद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात पूजेसाठी गेले. (हेही वाचा, Janardhan Bhoir: हा पठ्ठ्या आता हेलिकॉप्टरने दूध विकणार! भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांची Success Story)

प्रथमा ग्रुपचे मालक बोईनपल्ली श्रीनिवास राव त्यांच्या कुटुंबीयांसह एअरबस ACH-135 मध्ये खास पूजेसाठी हैदराबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या यदाद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी ( Sri Lakshmi Narasimha Swamy Temple) मंदिरात गेले. तेथे त्यांनी तीन पुजार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सहकुटूंब आणि यथासांगपणे वाहन पूजा विधी केले. विशेष म्हणजे हे सर्व विधी हेलिकॉप्टरसमोर करण्यात आले.

सांगितले जात आहे की, बोईनपल्ली श्रीनिवास राव यांनी खरेदी केलेल्या एअरबस ACH-135 या हेलिकॉप्टरची किंमत 5.7 दशलक्ष इतकी आहे. हेलिकॉप्टरसोबतच्या ‘वाहन पूजा’चे व्हिज्युअल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बोईनपल्ली श्रीनिवास रावही चर्चेत आले आहेत.

व्हिडिओ

दरम्यान, बोईनपल्ली श्रीनिवास राव यांनी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टरची पूजा पार पडताना त्यांचे नातेवाईक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव हेदेखील उपस्थित होते. या कुटुंबाने आपल्या हेलिकॉप्टरने मंदिराभोवताली असलेल्या डोंगराभोवती घिरट्या घातल्या. राव यांचा प्रथमा ग्रुप पायाभूत सुविधा, ऊर्जा, उत्पादन, दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच, महाविद्यालयं आणि रुग्णालयांचीही त्यांची मोठी श्रृंखला आहे.