Success Story of Janardan Bhoir: सायकल किंवा बाईकला दोन्ही बाजूला कॅन लावून दूध विकायला जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपण पाहतो. काही लोक दूध विकण्यासाठीच वाहन खरेदी करतात. भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर (Entrepreneur Janardan Bhoir ) मात्र यात भलतेच वेगळे ठरले आहेत. या पठ्ठ्याने चक्क दूध विकण्यासाठी हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. होय, वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल परंतू हे खरे आहे. जनार्दन भोईर (Janardan Bhoir) आणि त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) सध्या भिवंडी (Bhiwandi) परिसर आणि प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चेत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जनार्दन भोईर यांचा शेतीचा व्यवसाय पूर्वंपार आहे. परंतू, त्यासोबतच ते रिअल इस्टेट व्यवसायातही आहेत. त्यामुळे आपल्या उद्योग व्यवसायासाठी ते देश आणि जगभर फिरत असतात. अशा वेळी त्यांना दळणवळण करणे सोपे जावे यासाठी त्यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. जनार्दन यांचे म्हणने आहे की, डेअरी उद्योगामुळे त्यांना पंजाब, गुजरात, हरियाणा, राजस्थान यांसारख्या विविध राज्यांमध्ये सातत्याने जावे लागते. अशा वेळी प्रवासात त्यांचा खूप वेळ जातो. त्यामुळे त्यांनी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दूध विक्री करण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी हा विचारच अनेकांना धक्का देणारा वाटत आहे. (हेही वाचा, अबब! 15 कोटी रुपयांहूनही महाग आहे हा रेडा; 6 फूट उंच तर, 14 फूट लांब, वजन फक्त 1300 किलो)
जनार्दन भोईर यांनी आपल्या घराजवळ एक हेलिपॅडही तयार केले आहे. तसेच, या हेलिपॅडजवळ एक पायलट रुम आणि टेक्नीशियन रुमही बनवली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना भोईर यांनी सांगितले की, येत्या 15 मार्चला त्यांच्या हेलिकॉप्टरची डिलीव्हरी होणार आहे. त्यांच्याकडे 2.5 एकर जागेवर हेलिकॉप्टरसाठी राऊंड पट्टी आणि इतर गोष्टी बनविण्यात येणार आहेत. (हेही वाचा, सांगली मधील आटपाडीतील जनावरांच्या बाजारात तब्बल 1.50 कोटी रुपयांचा मोदी बकरा विक्रीस)
शेती हा एक फायदेशीर परंतू, अनेक अर्थाने बदनाम आणि नेहमीच चर्चेत राहणारा उद्योग. बदनाम अशासाठी की शेतीतून उत्पन्न मिळत नाही. शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते वैगेरे वैगेर आरोप तर नित्याचेच. परंतू, शेती जर काळजीपूर्वक केली आणि त्याला इतर जोडधंद्याचीही जोड दिली तर काय घडू शकते याची अनेक उदाहरणे या आधीही पुढे आली आहेत. भिवंडी येथील शेतकरी जनार्धन हे त्यातलेच एक उदाहरण.