गुगल अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या वेतनात वाढ; आकडा ऐकून व्हाल अवाक!
Sundar Pichai (Photo Credits: ANI)

'गुगल' (Google) आणि 'अल्फाबेट' (Alphabet) या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्या पगारात आता कोट्यावधी रुपयांची वाढ झाली आहे. गुगलच्या अल्फाबेट या कंपनीकडून पिचाई यांना 1720 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये 1706 कोटी रुपयांचे शेअर्स आणि 14.22 कोटी रुपये वार्षिक वेतनाचा समावेश आहे. सुंदर पिचाई यांचे नवीन पॅकेज जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. पिचई यांच्या वेतनात तब्बल 200 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुगलमध्ये आतापर्यंत कोणत्याही सीईओला एवढ्या रक्कमेचे वेतन देण्यात आलेले नाही.

या वेतनाशिवाय पिचाई यांना एस अँड पी 100 इंडेक्समध्ये अल्फाबेटची कामगिरी चांगली राहिल्यास अतिरिक्त 639 कोटी रुपये दिले जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई बिन यांनी आपले पद सोडले. त्यामुळे पिचाई यांची गुगलसह अल्फाबेट कंपनीच्या सीईओ पदी निवड करण्यात आली. पिचाई यांना 2016 मध्ये 1422 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. गुगल आणि अल्फाबेटसारख्या मोठ्या कंपन्यांची धुरा त्यांच्याकडे जाणं ही अभिमानाची बाब आहे. गुगलने 2015 मध्ये कंपनीच्या स्वरूपात मोठा बदल करून अल्फाबेट कंपनीची स्थापना केली. (हेही वाचा - ICC World Cup2019: या दोन संघात रंगेल फायनल ची लढत, Google CEO पिचाई च 'सुंदर' भाकीत)

पिचाई यांचे पॅकेज ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पंरतु, पिचाई यांच्यापेक्षा टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांना 3591 कोटी रुपयांचे पॅकेज आहे. सुंदर पिचाई यांच्याकडे सुरुवातीला गुगल टूलबार, डेस्कटॉप सर्च, गुगल गिअर आदी कामांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्या सोशल मीडियावर पिचाई यांच्या पगारावाढीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूर आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं. पिचाई 11 वर्षं गुगलमध्ये कर्मचारी होते. 2015 मध्ये त्यांची गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून ते जगभर प्रसिद्ध झाले.