Fact Check: प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर 899 रुपयांमध्ये विकले जात आहे Remdesivir? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य
Fake News on Remdesivir (Photo Credits: WhatsApp)

सध्या देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट सुरु आहे. दररोज लाखोंच्या संख्येनी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशात कोरोना विषाणूवर प्रभावी ठरलेल्या रेमेडिसवीर (Remdesivir) इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. मात्र सध्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशात रेमेडिसवीर इंजेक्शनविषयी सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. मेडिकल स्टोअरमध्ये रेमेडिसवीर इंजेक्शन 4000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात आहे, मात्र पंतप्रधान जन औषधी केंद्रात (Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra) याची किंमत 899 रुपये आहे, असा दावा या पोस्टमध्ये केला आहे. मात्र हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे आढळून आले आहे.

पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर केंद्रात विक्री केल्या जाणाऱ्या सर्व औषधांची व उत्पादनांची यादी आहे. या यादीमध्ये कुठेही रेमेडिसवीर इंजेक्शनचा उल्लेख नाही. तसेच वेबसाईटवरही याचा कुठे उल्लेख नाही. तपासादरम्यान दैनिक भास्करच्या टीमने पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या हेल्पलाईनशी संपर्क साधला. त्यावेळी औषध केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पंतप्रधान जन औषधी केंद्रात रेमेडिसवीर इंजेक्शन विकले जात नाही.

रेमेडिसवीर इंजेक्शन मेडिकल स्टोअरमध्ये जास्त किंमतीमध्ये विकले जात असल्याची माहिती काही प्रमाणात खरी आहे. इंडिया टीव्ही वेबसाइटवर 12 एप्रिल 2021 रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये म्हटले होते की, रेमेडिसवीर इंजेक्शन मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये 18 हजार रुपये किंमतीला विकले जात होते. यानंतर प्रशासनाने कारवाई करून दुकान सील केले. अशा प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमधील दावा खोटा असून, पंतप्रधान जन औषध केंद्रावर रेमेडासिव्हिरची इंजेक्शन्स विकली जात नाहीत. (हेही वाचा: देशात 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा? PIB Fact Check ने सांगितले व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सत्य)

रेमेडिसवीरच्या तुटवड्याबाबत उद्भवलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकारने सांगितले की, देशात रेमेडिसवीरची कमतरता नाही. रेमेडिसवीर हे फक्त रुग्णालयात दाखल असलेल्या ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या रूग्णांसाठीच आहे, याचा उपयोग घरी केल्या जाणाऱ्या उपचारात होणार नाही.