Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली की नाही? भारतीय लष्कराने पत्रक काढून केला खुलासा
Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक लेह-लडाखचा दौरा केला. यावेळी त्यांनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस जवानांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी लेह, लडाखमधील सैनिकांचं मनोधैर्य वाढवलं. तसचं गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांचीदेखील मोदींनी भेट घेतली. परंतु, त्यांच्या या भेटीवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर #MunnaBhaiMBBS हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर भारतीय लष्कराने (Indian Army) एक पत्रक काढून यासंदर्भात खुलासा केला आहे. या पत्रात लष्काराने नरेंद्र मोदींनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली की, नाही हे सांगितले आहे.

लष्कराने जाहीर केलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. ते 3 जुलै रोजी लडाख येथील रुग्णालयात आले होते. परंतु, यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर टिका केली जात आहे. मात्र, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नरेंद्र मोदी हे सैनिकांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी या लेहच्या रुग्णालयात गेले होते. त्याप्रमाणेचं त्यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांचंही मनोधैर्य उंचावलं. परंतु, त्यांच्या या भेटीवर टिका होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत, असंही लष्कराने पत्रकात म्हटलं आहे. (हेही वाचा - Fact Check: फुलांनी सजलेल्या कास पठाराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या फोटो मागील सत्य)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एका प्रशिक्षण हॉलचे रुपांतर रुग्णालयात करण्यात आलं आहे. परंतु, त्यावरून पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. हे अत्यंत वाईट आहे. गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी या ठिकाणी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे, असंही लष्कराने या पत्रकात सांगितलं आहे.

दरम्यान, मोदींच्या या भेटीवर सोशल मीडियावरून टीका केली जात आहे. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात ज्याप्रमाणे मुन्नाभाई आपण डॉक्टर असल्याचं त्यांच्या वडिलांना भासवतो तशाचं प्रकारेची ही भेट होती, असंही काही पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील काही सीन या घटनेशी जोडले आहेत. परंतु, या सर्व प्रकारानंतर भारतीय लष्कराने यासंदर्भात एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे.