बिहारच्या (Bihar) एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रामायणामध्ये जसे प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य तोडून सीतामाईच्या गळ्यात माळ घातली होती, अगदी तसेच इथे एका वरानेही धनुष्य मोडूनच आपल्या होणाऱ्या पत्नीच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि त्यानंतर लग्नाच्या इतर विधी पूर्ण झाल्या. मुलीच्या गळ्याला हार घालताच या दोघांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. लग्नातील हे अनोखे स्वयंवर (Swayamvar) पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
सारण जिल्ह्यातील सोनपुर प्रखंड अंतर्गत सबलपूर पूर्व क्षेत्रात हे लग्न पार पडले. तर प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचे लग्न आपल्या सर्वांना माहीतच असेल. सीतेच्या स्वयंवरामध्ये रामाने शिवधनुष्य तोडले होते व त्यानंतर सीतेच्या गळ्यात वरमाला घालण्यात आली. अगदी असेच लग्न बिहारमध्ये पार पडले. फरक इतकाच होता की, त्या लग्नामध्ये सीतेची मनीषा बाळगून अनेक महान योद्धे सामील झाले होते, तर या लग्नामध्ये वर कोण असणार हे आधीच निश्चित झाले होते.
अशाप्रकारे अहमदपुरच्या धर्मनाथ राय यांचा मुलगा अर्जुन कुमार सोबत सबलपुर पूर्व पंचायतचे मुंशी राययांची पुत्री प्रियंका कुमारी हिचे लग्न पार पडले. हे लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या लग्नामध्ये नवऱ्यामुलाला राम म्हणून संबोधले जात होते. (हेही वाचा: अयोद्धेत राम जन्मभूमी स्थळावरून खरंच प्राचीन संस्कृत भाषेतील हस्तलिखित सापडले? सोशल मीडीयात शेअर होतोय दिशाभूल करणारा व्हिडिओ; पण इथे जाणून घ्या सत्य)
कलियुगातील हे तथाकथित स्वयंवर पाहण्यासाठी लोकांनी इतक्या मोठ्या प्रमणात गर्दी केली होती की, कोविड प्रोटोकॉलनुसार सामाजिक अंतराचा नियम अगदी पायदळी तुडवला गेला. व्हिडीओमध्येही हे लग्न पाहण्यासाठी आलेल्या लोकांची प्रचंड गर्दी दिसत आहे.