Bihar Assembly Elections 2020: पालीगंज येथे ना कार, ना दुचाकी तर चक्क म्हैशीवर बसून अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले उमेदवार; पहा व्हिडिओ
म्हैशीवर बसून उमेदवारी अर्ज (संग्रहित संपादित प्रतिमा)

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections 2020) राजकीय पक्षांनी कंबर कसून आपली तयारी सुरु केली आहे. सध्या राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अशात एका अपक्ष उमेदवाराने फॉर्म भरण्याचा अनोखा मार्ग अवलंबिला, ज्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. पालीगंज (Paliganj) विधानसभेतील पीपुल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटचे रविंद्र यादव उर्फ ​​कपिल यादव (Ravindra Yadav) हे अर्ज भरण्यासाठी गाडी किंवा दुचाकीवरून नव्हे तर म्हैशीवर सवार होऊन गेले होते. यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. सध्या सोशल मिडियावर या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रविंद्र प्रसाद म्हैशीवर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत. यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक व इतर जनताही चालत जाताना दिसत आहे. मोठ्या ऐटीत ते म्हैशीवर बसून, सर्वांना नमस्कार करत पुढे जात आहेत. जेव्हा कपिल यादव म्हशीवर बसून अर्ज भरण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना विचारले की त्यांनी ही अनोखी शैली का अवलंबली? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले ते एका शेतकऱ्याचा मुलगा आहेत, तसेच त्यांचे पूर्वज म्हैशीवरूनच प्रवास करायचे म्हणून त्यांनीही म्हैशीवर बसून फॉर्म दाखल करण्याचा निर्णय घेतला.

तसेच गरिबांना मदत करायची आहे, म्हणून त्यांनी निवडणुकीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकवेळीच निवडणुकीमध्ये अशा अनेक चित्र विचित्र गोष्टी दिसून येतात. मात्र रविंद्र प्रसाद यांची ही शक्कल खूपच वेगळी असून असा प्रकार याआधी कधी दिसला नव्हता. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत जेडीयूच्या 122 पैकी 7 जागा हिंदुस्थानी आम मोर्चाला आणि भाजपाच्या 121 पैकी 9 जागा विकास इंसान पार्टीला देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA चे जागावाटप जाहीर; जदयु, भाजप यांच्यासह पाहा घटक पक्षांना किती जागा?)

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, दुसर्‍या टप्प्यात 3 नोव्हेंबरला मतदान होईल आणि तिसर्‍या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील.