Fact Check: वांद्रे स्थानकातील मजूरांच्या गर्दीला जबाबदार असणारा विनय दुबे मुसलमान? त्याचा धर्मावरुन सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मागील सत्य काय?
Post shared with Vinay Dubey’s father’s name is Mahmood (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संकटामुळे देशातील लॉकडाऊनही 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करत ही घोषणा केली. त्याच दिवशी मुंबई मधील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर (Bandra Railway Station) घरी परतण्यासाठी मोठ्या संख्येत मजूर एकत्रित जमले. मजूरांनी केलेल्या गर्दीच्या आरोपाखाली विनय दुबे (Vinay Dubey) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर आता विनय दुबेच्या नावाने एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात विनय दुबे मुसलमान असून त्याच्या वडीलांचे नाव महमूद खान आहे. मात्र फसवणूक करण्यासाठी त्याने हिंदु नाव ठेवले आहे असा दावा करण्यात आला आहे. (Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दीचे प्रकरण आरोपी विनय दुबे याला भोवले, 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी)

तसंच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, "विनय दुबेची आई सरिता यांनी मुसलमान व्यक्तीशी लग्न केले आहे. मात्र हिंदूंची आणि देशाची फसवणूक करण्यासाठी त्याने खोट्या नावाचा आधार घेतला आहे." मुसलमानांचे हे षडयंत्र आहे असेही पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

विनय दुबे मुसलमान असल्याचा दावा करणारी पोस्ट:

या पोस्टची पडताळणी केली असता ही पोस्ट चुकीची माहिती देत असल्याचे उघड झाले आहे. विनय दुबे हा हिंदू असून त्याच्या वडीलांचे नाव जटाशंकर दुबे आहे. तो मुंबईत रिक्षा चालवतो. रिपोट्नुसार अलिकडेच जटाशंकर दुबे यांनी आपल्या बचतीतून 25 हजार रुपये कोरोना व्हायरस संकटात मदत म्हणून सीएम रिलीफ फंडात जमा केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनय दुबे नवी मुंबई मधील ऐरोली येथील रहिवासी आहे. समाजसेवक होण्याची त्याची इच्छा आहे. 2019 मध्ये विनय दुबेने विधानसभा निवडणूकीसाठी कल्याण येथून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.

Screenshot From ECI's Website:

विनय दुबे मुसलमान असून त्याच्या वडिलांचे नाव महमूद असल्याची पोस्ट फेक आहे. विनय दुबे 'चलो घर की ओर' हे कॅम्पेन चालवत होता. त्या दरम्यान त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर वांद्रे स्थानकात मजूरांची मोठी गर्दी जमली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.