Man Dies After Eating Lizard (Photo Credits: Twitter, File Image)

चार मित्र एकत्र भेटले की मजामस्ती, टिंगल, पैजा हे समीकरण ठरलेलंच असतं, त्याच वातावरणात अनेकदा आपण एरवी विचारही केला नसेल अशा गोष्टी करूनही जातो, मात्र त्याचे पडसाद नंतर उमटतात. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया (Australia)  मधील डेव्हिड डूवेल (David Dovel)  या तरुणाच्या बाबतीत घडला. आपल्या मित्रांना भेटल्यावर त्यांच्यासोबत गंमतीत लावलेली एक पैज डेव्हिड च्या जीवावर बेतली.

डेव्हिड आपली पत्नी व मुलांच्या सोबत मागील वर्षी ख्रिसमसच्या दिवशी पार्टीसाठी आपल्या मित्राच्या घरी गेला होता, त्यावेळी त्याचे इतरही मित्र तिथे जमले होते. या मित्रांनी मजेत डेव्हिडला एक जीवंत पाल खाण्याचे चॅलेंज दिले. मित्रांसमोर स्वतःला हिरो दाखवण्यासाठी डेव्हिडने सुद्धा ते चॅलेंज स्वीकारले, आणि चक्क एक पाल खाल्ली. मात्र त्यानंतर त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या, यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र तिथे त्याची तब्येत आणखीनच बिघडत गेली. आणि त्यानंतर दहाच दिवसात त्याचा मृत्यू झाला. कल्याण: वडापाव खाल्याने ग्राहकांना विषबाधा, विक्रेत्यावर गुन्हा दाखल

परदेशी मीडियाच्या वृत्तानुसार, डेव्हिडवर उपचार सुरु असताना त्याला एकाएकी पित्ताच्या हिरव्या उलट्या होऊ लागल्या, त्याच्या पोटाचा आकार एखाद्या गरोदर बाईच्या पोटाइतका वाढायला लागला. एका क्षणी तर त्याला इतक्या प्रचंड वेदना व्हायला लागल्या की डॉक्टरांना त्याला कोमात जाण्याचे औषध द्यावे लागले. मात्र कोणत्याच उपचारांचा गुण न आल्याने अखेरीस तो गतप्राण झाला. यानंतर, डेव्हिडच्या पत्नीने मीडियाशी संवाद साधत या प्रकारची माहिती दिली, आपण ज्या पार्टीला गेलो होतो तिथे मुलांनाही आमंत्रण असल्याने तिचे डेव्हीडवर लक्ष नव्हते मात्र हे चॅलेंज दिल्याचे तिला माहित होते असेही ती म्हणाली.

यासंदर्भात डेव्हिडच्या मित्रांनी मात्र स्वतःला वाचवण्याचा पवित्रा स्वीकारला होता, डेव्हिडला चॅलेंज दिले हे जरी खरे असले तरी आपण त्याला पाल खतना पहिलेच नाही असे त्याच्या मित्रांनी सांगण्यास सुरु केले आहे. मात्र पोस्टमार्टमच्या अहवालानुसार डेव्हिडचा मृत्यू हा पाल खाल्ल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरु असून अद्याप या मित्रांना अटक करण्यात आलेली नाही.