Republic TV  पाहून तरुणाची आयुक्त परमबीर सिंह यांना धमकी; मुंबई पोलिसांचा दावा
Mumbai Police Commissioner | Photo Credits: Twitter/ ANI

सातत्याने रिपब्लिक टीव्ही (Republic TV) पाहून प्रभावित झालेल्या एका तरुणाने चक्क मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Polic Commissioner Parambir Singh) यांच्या कुटुंबीयांनाच धमकावल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार धमकी देणारा तरुण एमबीबीएस (MBBS) शिक्षण घेणारा 21 वर्षांचा विद्यार्थी आहे. या तरुणाने सोशल मीडियाचा वापर करत परमबिर सिंह यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा तरुण रिपब्लिक टीव्ही सातत्याने पाहात असतो. तसेच, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ( Sushant Singh Rajput Suicide Case) या वाहिनीने केलेल्या वार्तांकनावरुन हा तरुण प्रभावित झाल्याचे पुढे आल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्ही जे वार्तांकन करत असे ते सर्व खरेच आहे, असे हा तरुण मानत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. हा तरुण परमबिर सिंह यांच्या कुटुंबीयांना धमकी देत होता. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थीती चांगली आहे. त्याच्या कुटुंबातील लोक विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. (हेही वाचा, TRP Scam: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबईतून एकाला अटक, खात्यात मिळाली 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम)

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून मुंबई पोलीस आयुक्त आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या पद्धतीने धमकीचे मेसेज मिळत होते. अधिकारी या मेसेजकडे लक्ष देत नव्हते. परंतू, जवळच्या नातेवाईकाला आलेल्या मेसेजनंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. या तरुणाने पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकाला सोशल मिडायाच्या माध्यमातून धमकी दिली की, पोलीस आयुक्तांना समजावून सांगा की गप्प राहा. ते (पोलीस आयुक्त) गप्प होणार नसतील त्यांना गप्प करण्याचे माझ्याकडे इतरही काही मार्ग आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणात रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच या तरुणास ताब्यात घेण्यातआले. हा तरुण मुंबई येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतो. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत पुढे आले की, त्याची बहीण चार्टर्ड अकाऊंटंट आहे. त्याचे वडील केमिकल इंजिनीअर आहेत. त्यांचा स्वत:चा कारखाना आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तरुणाच्या वडीलांनी पोलिसांसमोर मान्य केले की, त्यांच्या मुलाची चूक झाली आहे. चुकीच्या लोकांच्या संपर्कात आणि प्रभावाखाली आल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे वडीलांनी सांगितले.