
मुंबई आणि उपनगरात मागच्या विकेंड ला जोरदार पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर झाले होते. यामध्ये वसई (Vasai) आणि बुलढाणा (Buldhana) मधील शेतात साचलेले पाणी दाखवणारा फोटो सुद्धा चांगलाच व्हायरल होत आहे, आता यात पाणी साचणे हे आकर्षण नसून या साचलेल्या पाण्यात बसलेले काही दुर्मिळ जीव हा चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओज आणि फोटो मध्ये पाण्यात अत्यंत दुर्मिळ पिवळ्या रंगाचे (Yellow Frogs) बेडूक दिसत आहेत. अनेकदा पावसात असे प्राणी, किडे, कीटक पाहायला मिळतात, त्यातीलच हे पिवळ्या रंगाचे बेडूक आहेत. नेहमीच्या बेडकांपेक्षा या बेडकांचा आवाज जरा वेगळा असतो आणि मुख्य म्हणजे नावाप्रमाणे यांचा रंग पूर्णतः पिवळा धम्मक असतो.
वसईच्या नवाळे गावात विशाल वर्तक यांच्या शेतात हे पिवळे बेडूक दिसून आले. तर बुलढाणा येथील गजानन पार्क घाटपुरी नाक्याजवळ पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डबक्यात पिवळ्या रंगाचे बेडके आढळली होती, पांडुरंग हतकर यांनी हे फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओज मध्ये तुम्ही या प्राण्यांचा आवाज ऐकू शकता.
पिवळ्या बेडकांचे फोटो आणि व्हिडीओ
दरम्यान, हे बेडूक Indian Bullfrogs या वैज्ञानिक नावाने ओळखले जातात, यांचा आकार मोठा असतो मात्र यांचा धोका नसतो. हे विषारी बेडूक नसतात. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका या देशात या प्रजाती आढळून येतात. पिवळा हा त्यांचा खरा रंग नसतो मुळात हे बेडूक ऑलिव्ह ग्रीन रंगाचे असतात मात्र प्रजनन प्रक्रिया करण्याआधी ते रंग बदलून पिवळे होतात.