Worli Bandh: महापुरूषांबद्दल अवमानजनक वक्तव्याप्रकरणी आज मुंबईत 'वरळी बंद' ची हाक
Bandh Representative Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानं झाल्याप्रकरणी राजकारण तापल्याचं पहायला मिळालं आहे. त्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलनं, मोर्चे निघाले. काही ठिकाणी बंद पाळण्यात आले आहेत. जालना, पुणे पाठोपाठ आज (15 डिसेंबर) मुंबई मध्ये वरळीतही बंद (Worli Bandh) पाळला जात आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत हा बंद पाळला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वरळीतील आंबेडकरी आणि काही अन्य संघटनांनी हा बंद पुकारला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य झाली. त्याचे विविध पातळ्यांवर निषेधही करण्यात आले. आता आज वरळी बंद करण्यात आला आहे. दरम्यान महाविकास आघाडी कडून याच मुद्द्यावरून भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यापालांना पदावरून हटवावे अशी मागणी देखील जोर धरत आहे. राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून त्यामध्ये माझ्या भाषणातील काही भागाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: मुंबईमध्ये 17 डिसेंबरला महाविकास आघाडी काढणार महामोर्चा; Uddhav Thackeray यांची घोषणा.

आज वरळी बंद च्या काही पोस्ट सोशल मीडीयामध्येही जारी करून लोकांना माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ वरळी आहे. त्यामुळे आजचा वरळी मधील बंद अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी हातमिळवणी केली आहे. त्याची अधिकृत माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही या बंदला पाठिंबा मिळू शकतो.