संजय राठोड यांच्यावर अजून एक आरोप; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार
Sanjay Rathod (Photo Credits: FB)

राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात आणखी एक तक्रार समोर येत आहे. एका महिलेने संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात पीडित महिलेने यवतमाळ पोलिसांत (Yavatmal Police) लेखी तक्रार दिली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण-संजय राठोड यांच्यात आत्महत्येपूर्वी झालेल्या फोन संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती)

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हटलंय."

चित्रा वाघ ट्विट:

यापूर्वीच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले माजी मंत्री संजय राठोड अजून एका आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. पूजा चव्हाण या 22 वर्षीय मुलीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड यांच्याशी तिचे संबंध असल्याचे उघडकीस आले. पूजाने 7 फेब्रुवारीला पुणे येथील राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. यात पूजा आणि संजय यांच्यात आत्महत्येपूर्वी संभाषण झाल्याचे पूरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने या प्रकरणात संजय राठोड यांना 28 फेब्रुवारी रोजी मंत्रीपद सोडावे लागले होते.