Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण-संजय राठोड यांच्यात आत्महत्येपूर्वी झालेल्या फोन संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती
Pooja Chavan & Sanjay Rathod (Photo Credits: PTI)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) पुणे पोलिसांना (Pune Police) महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. पूजाच्या आत्महत्येपूर्वीचे विविध कॉल्सचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. यानुसार आत्महत्येच्या 4-5 दिवस आधी पूजाचे राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासोबत फोनवरुन बोलणे झाल्याचे उघड होते. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, पूजाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण 90 मिनिटांचं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

यावर्षी 7 फेब्रुवारीला पूजाने पुणे येथील राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. फोनमधून मिळालेल्या पुराव्यानुसार, पूजाशी बोलणारी व्यक्ती संजय राठोड असल्याचे समोर येत आहे. पूजाने त्यांच्यातील सर्व संभाषण रेकॉर्ड केले होते. या दोघांमधील संभाषण हे बंजारा भाषेतून झाले होते. या संभाषणाचा अनुवाद सध्या आम्ही करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पूजा आणि संजय राठोड यांच्यातील संभाषण रेकॉर्ड झालेला फोन हा पुण्यातील फॉरेन्सिंग सायन्स लॅबमध्ये डेटा कलेक्ट करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील लॅबकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये पूजाच्या आत्महत्येच्या 24 तास पूर्वीपासूनचे रेकॉर्डिंग आहे. (Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवला आहे का? भाजपचा खोचक सवाल)

लॅबमधून मिळालेल्या अपडेटनुसार, सीसीटीव्ही फुटेज हे खरे आहे. फोन रेकॉर्डिंगमध्ये असलेला आवाज आणि संजय राठोड यांचा आवाज यांच्या तुलना करण्यात येणार आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण ही 22 वर्षांची मुलगी मुळची बीडची होती. शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. मात्र तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोडशी असलेले तिचे संबंध समोर आले. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.