मुंबई: विरार लोकल मधून प्रवाशाने फेकलेल्या निर्माल्यातील नारळामुळे महिला जखमी
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करताना निर्माल्य खाडीत फेकण्याच्या घटना वारंवार घडतात. मात्र प्रवाशांची हीच सवय महिलेच्या जीवावर बेतली आहे. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वैतरणा खाडीदरम्यान (Vaitarna Creek) लोकलमधून निर्माल्य खाडीत फेकत असताना त्यातील नारळ डोक्यात पडून एक महिला जबर जखमी झाली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (24 एप्रिल) पश्चिम रेल्वेची लोकल विरारच्या दिशेने जात असताना एका प्रवाशाने निर्माल्य भरलेली पिशवी खाडीत फेकली. मात्र ही पिशवी खाडीत न पडता वैतरणा पुलावरुन चालत असलेल्या रोहिणी पाटील या महिलेच्या डोक्यावर आदळली आणि त्यातली नारळाच्या फटक्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. नारळच्या फटक्यामुळे त्या जागीच चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर त्यांना इतर प्रवाशांनी रुग्णालयात दाखल केले. (मुंबई: सायन-माटुंगा दरम्यान ट्रेनवर दगड भिरकवल्याने महिला प्रवासी जखमी)

मुंबई मिररशी बोलताना रोहिणी यांनी सांगितले की, मी माझ्या लहान मुलीला घेऊन ब्लड टेस्ट करण्यासाठी जात होते. पुलावरुन जात असतानाच अचानक नारळ डोक्यात आदळला आणि मी तिथेच कोसळले. प्रवाशांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मी उपचार घेतले. या दुर्घटनेत डोक्याला चार टाके पडले आहेत.

वैतरणा वाढीव या गावातील नागरिकांना स्टेशनवर जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने खाडीवरील पुलाचा वापर करावा लागतो. प्रवासादरम्यान अनेक प्रवासी कचरा, निर्माल्य, इतर वस्तू खाडीत भिरकवतात. मात्र याचा त्रास पुलावरुन जाणाऱ्या प्रवाशांना होतो. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणतीही वस्तू खाडीत फेकू नये, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.