
Pune Shocker: भोर येथील राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरून पडून पुण्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू(Girl Dies After Falling) झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. मृत महिलेचे नाव तारल अटापालकर असे आहे. ती पुण्यातील नर्हे परिसरातील रहिवासी आहे. तारल अटापालकर तिच्या कुटुंबासह फिरण्यासाठी वॉटर पार्कला गेली होती. इतर अनेक राईड्समध्ये सहभागी झाल्यानंतर आणि झिपलाइन (Ziplining) ट्राय करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तारल अपघात झाला तेव्हा झिपलाइनमध्ये स्वतःला सुरक्षितपणे बसवण्याचा प्रयत्न करत होती. सेफ्टी हार्नेसपर्यंत पोहचणे अवघड असल्याने, ती लोखंडी स्टूलवर उभी राहिली. स्टूल घसरला, ज्यामुळे तिचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्मवरून पडली. पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तरालच्या कुटुंबाने उद्यान व्यवस्थापनावर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे आणि जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. झिपलाइनिंग क्रियाकलापांना मदत करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित नव्हता असा त्यांचा आरोप आहे. राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे.