Maharashtra Lockdown Update: महाराष्ट्रातील वाढती कोरोना प्रकरणे लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) लॉकडाऊनबाबत (Lockdown) निर्णय घेऊ शकतात. आज मुख्यमंत्री कोविड-19 टास्क फोर्सची (Task Force) बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी तसेच खासगी रुग्णालयांशीही चर्चा करत आहेत. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, हे सर्व लोक सरकारला पाठिंबा देत आहेत. लॉकडाउनचा कालावधी किती असेल, याची औपचारिक घोषमा केली जाईल. राज्यातील कोरोना संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. (वाचा - TMC: कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतला 'हा' निर्णय)
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या लॉकडाऊन अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी वैध कारण असणे आवश्यक आहे. यात वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. याशिवाय लॉकडाऊन काळात लांब पल्ल्याच्या गाड्या आणि हवाई उड्डाणे थांबविले जाणार नाहीत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी सांगितले की, काही दिवस लॉकडाउन घालणे आवश्यक आहे. त्यानंतर लोकांना दिलासा मिळू शकेल. रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सशी बैठक होणार आहे. यात लॉकडाउन कालावधीसंदर्भात अधिकृतपणे शिक्कामोर्तब होईल.
शनिवारी मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. एकीकडे लोकांच्या भावना तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. कोरोना विरुद्धची लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.