Nitesh Rane यांना जमीन मिळणार की अटक होणार? उद्या येणार न्यायालयाचा निर्णय; आज साडेतीन तास चालली सुनावणी
Nitesh Rane (Photo Credit: Twitter)

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणेंविरोधात शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. नितेश राणे यांच्या अटकेची मागणी करत त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावर आता उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे तुरुंगात जाणार की जामीन मिळणार, याचा फैसला बुधवारी होणार आहे.

मंगळवारी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही. हांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. नितेश राणे यांच्या वतीने वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तर सरकारच्या वतीने अधिवक्ता प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. साडेतीन तास चाललेल्या सुनावणीनंतर सायंकाळी साडेसहा वाजता न्यायालयाची वेळ संपली. संग्राम देसाई यांनी न्यायालयाला मुदत वाढवून देण्याची विनंती केली. आणखी दहा मिनिटांच्या चर्चेनंतर न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी सुरू ठेवणार असल्याचे सांगून आजची सुनावणी संपवली.

आजची सुनावणी सुरू झाल्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारले की, तुम्हाला जामीन मिळण्यास काही आक्षेप आहे का? सरकारी वकिलांनी ‘होय’ असे उत्तर दिले. यानंतर नितेश राणे यांच्यावतीने त्यांचे वकील संग्राम देसाई बोलू लागले. ते म्हणाले, 'पोलीस आता मोबाईल जप्त करण्याची मागणी करत आहेत. 24 आणि 25 डिसेंबरला सलग दोन दिवस नितेश राणे आणि संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी मोबाईल का जप्त करण्यात आला नाही? आता अटकेचे प्रयत्न का सुरू केले आहेत?’ (हेही वाचा: नितेश राणे यांच्या निलंबनाच्या शिवसेनेच्या मागणीमुळे अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज तहकूब)

राणेंचे वकील पुढे म्हणाले, '24 डिसेंबरला विधानसभेच्या पायऱ्यांवर जे काही झाले, त्यानंतरचा नितेश राणेंना अटक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. द्वेषपूर्ण भावनांपोटी अटक करण्याचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.’ आता याबाबत उद्या काय निर्णय लागतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.