महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा आता पांढर्‍या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार; जाणून घ्या आधार सोबत रेशन कार्ड कसं कराल लिंक?
Hospital | Pixabay.com

महाराष्ट्र सरकार कडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna) दीड लाख रुपयांचं विमा संरक्षण महाराष्ट्रातील केवळ पिवळ्या आणि केशरी या रेशन कार्ड धारकांसाठी मर्यादीत होते ते आता पांढर्‍या रेशन कार्डधारकांनाही (White Ration Card Holders) खुले करण्यात आले आहे. तसेच दीड लाखांची मर्यादा वाढवून 5 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे आता 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्रभरातील पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पांढरे रेशन कार्ड आपल्या आधार कार्डसोबत लिंक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडणीच्या सूचना राज्यभरात देण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येणारी एक आरोग्य विमा योजना आहे. राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जात आहे. jeevandayee.gov.in वर तुम्हांला या योजनेबद्दल सारी माहिती उपलब्ध होणार आहे.

आधार कार्ड -रेशन कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसे कराल लिंक?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड -रेशन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. ही लिंक करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन करता येऊ शकते.

ऑनलाईन आधार-रेशन कार्ड कसं कराल लिंक?

  • राज्याच्या Public Distribution System च्या पोर्टलला भेट द्या.
  • रेशन कार्ड वरील नंबर टाका.
  • आता आधार कार्ड नंबर टाका.
  • तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका.
  • continue/submit वर क्लिक करा.
  • मोबाईल वर आलेला ओटीपी टाका. तुमच्या रेशन कार्डशी आधार लिंक करण्याच्या तुमच्या विनंतीला अंतिम रूप देण्यासाठी मोबाईल वर आलेला OTP एंटर करा.

आधार-रेशन कार्ड ऑफलाईन कसं कराल लिंक?

  • तुमच्या कुटुंबातील सार्‍यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांची फोटोकॉपी काढा.
  • जर तुमचं आधारकार्ड बॅंक अकाऊंट सोबत लिंक नसेल तर बॅंक पासबूकची देखील फोटोकॉपी काढा.
  • घरातील कुटुंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट फोटो सह सारी कागदपत्र रेशन कार्ड ऑफिस मध्ये सादर करा.
  • आता आयडेंटिफिकेशन साठी फिंगरप्रिंट द्यावे लागतील.
  • सारी कागदपत्र सादर झाल्यानंतर तुम्हांला इमेल आणि एसएमएस द्वारा नोटिफिकेशन मिळेल.

आता प्रशासनाकडून सारी डॉक्युमेंट्स तपासून पाहिली जातील. रेशन कार्ड आणि आधार लिंक झाल्यानंतर तुम्हांला त्याची माहिती दिली जाईल.