सिंचन घोटाळा प्रकरण नेमकं आहे तरी काय? अजित पवार यांच्यावर का केले जात आहेत आरोप?
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

अँटी करप्शन ब्युरो विभागाने सिंचन प्रकल्प घोटाळ्याच्या एकूण 9 फाईल बंद केल्या ज्यामुळे अजित पवार यांची या घोटाळ्यातून सुटका झाल्येचे वृत्त अनेक माध्यमांनीं प्रसिद्ध केले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यात मदत केल्याने या फाईल बंद करून अजित पवार यांना क्लीन चीट मिळाल्याचेही म्हटले जात होते. परंतु या कितपत तथ्य आहे आणि हे सिंचन घोटाळा प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आज आपण पाहणार आहोत.

अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक परमबीर सिंग यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, या बंद करण्यात आलेल्या फाईल्सचा अजित पवार यांच्याशी कुठलाही संबंध नव्हता. तसेच त्यांनी हे ही नमूद केले आहे की त्यांच्याकडे 3000 टेंडर्सच्या फाईल्स आहेत. त्यापैकी ज्या केसमध्ये त्यांना काही आढळत नाही, त्या बंद करण्यात येतात. आणि यात काहीच नवीन नसून हे वेळोवेळी सुरू असतं.

सिंचन घोटाळा प्रकरण नेमकं काय?

अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना म्हणजेच 1999 ते 2009 या काळात पाठबंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पांवर एकूण 70,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हेनुसार सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असल्याचे म्हटले गेले आहे.

अजित पवारांवर काय आरोप आहेत?

सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या गैरव्यवहाराची जबाबदारी आणि आरोप अजित पवार यांच्यावर तत्कालीन विरोधी पक्षांनी केले होते.

अजित पवार यांची सिंचन घोटाळा प्रकरणावर प्रतिक्रिया

अजित पवार यांचं सिंचन घोटाळा प्रकरणात नाव चर्चेत असल्याने सरकारनामा या वृत्तपत्राने त्यांची एक प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटले की, "उजनी, कोयना सारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वाढवली. जलसंधारणाची अनेक कामं केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवारसाहेबांनी सरकारमध्ये असताना महत्त्वपूर्ण कामं मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीसाहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचं कौतुक केलं होतं."

अजित पवार यांचं पुढे काय होणार? पाहा त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया

तसेच राव साहेब दानवे यांनी अजित पवारणावर आरोप केले असल्याने त्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "माझ्यावरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप हे आता न्यायप्रविष्ट आहेत. असं असताना दानवे हे उलटसुलट वक्तव्यं करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी त्यांचा हा डाव आहे."