पंतप्रधान मोदींच्या 14 हजार कोटींच्या जगभ्रमणात काय मिळवले ? शिवसेनेचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित, संपादित प्रतिमा)

'पंतप्रधान मोदी यांनी जगभ्रमणात सगळय़ांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. अर्थात भगवान विष्णूचे ते अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागते. हिंदुस्थानशी अनेक देशांचे संबंध बरे नव्हते. ते दुरुस्त करण्यासाठी पंतप्रधानांना अशी जागतिक वणवण करावी लागते',असा सणसणीत टोला लगावतानाच 'या जागतिक वणवणीवर आतापर्यंत 14 हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला असून हे पैसे जनतेच्या तिजोरीतून उडवले असले तरी त्या बदल्यात हिंदुस्थानला काय मिळाले यावर खुली चर्चा होणे गरजेचे आहे', अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सानामध्ये उद्धव ठाकरे यांनी 'जगभ्रमण बरे पण मिळाले काय?' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखावर पंतप्रधान मोदींचे विदेश दौरे आणि त्याचे देशाला मिळालेले फलीत यावरुन सडकून टीका केली आहे. सोबतच राफेल आणि इतर मुद्द्यांवरुनही सरकारवर टिकेचे बाण सोडले आहेत. या लेखात उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 14 हजार कोटींच्या जगभ्रमणात मिळवले काय, हा प्रश्नच आहे. ‘आजाद हिंद सरकार’ स्थापनेस 75 वर्षे झाली, त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर पुन्हा तिरंगा फडकवला. मोदी त्यावेळी शूराचे शब्द बोलले, ‘‘हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांवर दुप्पट ताकदीने पलटवार करू.’’ आम्ही पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत. फक्त अमेरिकेच्या दबावाखाली येऊन ‘एफ-16’चा राफेल छाप सौदा करू नका. ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या धमकीवर कसा पलटवार करणार?, असा सवाल विचारला आहे. (हेही वाचा, 'अमृतसर रेल्वे अपघात म्हणजे बुलेट ट्रेनच्या धुंदीत रक्ताळलेले 'अच्छे दिन')

ओबामा व मोदी हे म्हणे दोस्त होते. आता ट्रम्पसुद्धा मित्र आहेत. जागतिक राजकारणात प्रेसिडेंट ट्रम्प हे मोदी यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेत असल्याचे बोलले जाते. इतके प्रेमाचे नाते असताना अमेरिकेने आम्हाला अशा धमक्या देणे योग्य आहे काय? रशियाकडून माल घेतलात तसा आमचाही माल उचला असे सांगणे हा व्यापार आहे. ही शुद्ध मैत्री नसून मतलबाचे नाते आहे. जगातील अनेक देश हिंदुस्थानला ‘बाजार’ मानत आहेत. सवाशे कोटींची लोकसंख्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त बाजार आहे. या बाजारावर नियंत्रण हवे म्हणून दोस्तीचे नाटक केले जाते. त्यात हिंदुस्थानच्या पैशांनी स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे धंदेही सुरूच आहेत. फ्रान्सने राफेल विमानांचा महागडा सौदा गळय़ात मारून स्वतःची चांदी करून घेतली. रशियाने ‘एस 400’ क्षेपणास्त्र वगैरेंचे दुकान लावून घेतले व आता अमेरिका ‘एफ-16’साठी गाळा मारीत आहे, असा आरोपही उद्धव यांनी केला आहे.