मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील (Mumbai Local) लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु गुरुवारी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रेल्वे वाहतूक हळूहळू सुरु होऊ लागली आहे. जोरदार पावसामुळे रात्रभर अडकून पडलेले प्रवाशी घरी परतू लागले आहेत. पश्चिम , रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा पूर्ववत होऊ लागल्या आहेत. यांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही हवामान विभागाने येत्या 3 दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मुंबई शहरात बुधवारी दुपारपासून पावसाने अधिक जोर धरल्यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी नोकरी, व्यवसाय आणि इतर कामासाठी घरांबाहेर पडलेले नागरीक पावसामुळे अडकून पडले होते. मात्र, या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा चालू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने बंद पडलेली मध्य रेल्वेची लोकल वाहतूक गुरुवारी पहाटेपासून हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक बुधवारी संध्याकाळीच सुरू झाली आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हे देखील वाचा-मुंबई लोकल रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्यांनो सावधान! भोगावी लागेल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील गणेश मंडळालाही फटका बसला आहे. परळ येथी काही गणेश मंडाळाच्या मांडवामध्ये पाणी शिरले होते. मुंबईसह, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई येथेही बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे या ठिकाणीही पाणी साचले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी तूर्त सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरीही हवामान विभागाने येत्या 3 दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.