Maharashtra assembly (Photo Credit - PTI )

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला राजकीय पक्षांचा प्रचार आज (शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. राज्यात २१ ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यामध्ये पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार केला. यासाठी सर्वच पक्षांनी राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा, पदयात्रा, बाईक रॅली, आदी माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. या सोमवारी मतदारराजा आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Elections 2019: साताऱ्यामध्ये भर पावसात पार पडली शरद पवार यांची सभा; 'लोकसभेसाठी उदयनराजेंना उमेदवारी देऊन केली चूक' (Video)

या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी प्रमुख लढत आहे. तसेच याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांना किती यश मिळेल, हे पाहणेही औत्सुक्याच ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून अनेक पक्षातील नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. काहींना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी पक्षांतर केलं. या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त इनकमिंग भाजपमध्ये झालं आहे.

राज्यात काही ठिकाणी गाजल्या प्रचारसभा –

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपला जाहीरनामा जनतेपुढे मांडला. यामध्ये काही नेत्यांच्या सभा अत्यंत गाजल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शुक्रवारी सातारा येथे भरपाऊसात झालेली सभा अवघ्या महाराष्ट्रात गाजली. वयाच्या ८० व्या वर्षी पवारांनी भरपावसात जोरदार भाषण केलं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रेसह भांडुप येथे घेतलेल्या सभाही खूप गाजल्या. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला विचार करून योग्य पक्षाला मतदान करा, असे आवाहन केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची धारावी येथील सभा महत्त्वाची ठरली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या.  सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दसरामेळाव्याला घेतलेली अमित शहा यांच्या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीत घेतलेली प्रचारसभाही पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी महत्त्वाची ठरली.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अधिकाअधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.