नागपूर: ज्येष्ठ संपादक, साहित्यिक वामन तेलंग (Vaman Telang) यांचे बुधवार (10 जून) दिवशी रात्री अचानक निधन झाले आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वामन तेलंग महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. एक गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
वामन तेलंग यांनी दैनिक तरूण भारतचे संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ येथे काम करताना आपला असा ठसा उमटविला. विदर्भात साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या तरूणांना तेलंग यांनी जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले. त्यांच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला चांगले लेखक, पत्रकार मिळाले. अशी भावना देखील ठाकरेंनी व्यक्त केली आहे. जेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन; कोव्हिड 19 चाचणी आली होती पॉझिटीव्ह.
विदर्भातील पत्रकारितेत साहित्यिक अभिरूची रुजविण्याचे श्रेयही तेलंग यांना जाते. परखड आणि प्रांजळ लेखन शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष व्यक्तिमत्वातही होते. त्यांच्या जाण्याने गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला आहे. तेलंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा शोक संदेश मुख्यमंत्र्यांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.