पुण्यात आळंदीच्या (Alandi) माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (Vaijayanta Umargekar) यांच्या सुनेने लग्नाच्या काही महिन्यातच आत्महत्या करून जीवन संपावल्याचं वृत्त हादरवणारं होतं. दरम्यान या आत्महत्येनंतर माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती आणि मुलगा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हुंड्यासाठी पैशांच्या मागणीतून नवविवाहितेला हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याची माहिती देण्यात आली आहे.
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर त्यांचे पती यांच्यावर सूनेचा छळ केल्याचा आरोप आहे तर मुलगा अभिषेकनेही त्यांना साथ दिली. संसारातील काही वस्तू, फर्निचर आणावे यासाठी सूनेचा सासरच्या व्यक्तींकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जात होता. यामधूनच मुलीने जीव दिल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. प्रियांका असं मृत मुलीचं नाव असून तिच्या आत्महत्येनंतर वडील अनिल घोलप यांनी आळंदी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नक्की वाचा: Mumbai High Court: हुंडा छळ प्रकरणी पतीच्या दूरच्या नातेवाईकांवरही होऊ शकतो गुन्हा दाखल, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश .
रविवार 10 जुलैच्या रात्री प्रियांका आणि अभिषेक यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर बेडरूममध्ये जाऊन प्रियांकाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येचं वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी आले. त्यानंतर प्रियांकाचा मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तेव्हा प्रियांकाने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.
प्रियांका ही पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती. नोव्हेंबर 2022 मध्ये प्रियांका आणि अभिषेक उमरगेकर विवाहबद्ध झाले होते. परंतु लग्नाच्या काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे.