Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिक्रिया, नितीन गडकरी, देवेंद्र फणवीस, जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पाहा
Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृत्वाखालील एनडीए सरकारचा 2023/2024 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक गोष्टी महाग तर अनेक गोष्टी स्वस्त केल्या. दरम्यान, या अर्थसंकल्पावर देशभरातून प्रतिक्रिया आली. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहे. राज्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर- नितीन गडकरी

नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. त्यामुळे आमचा अर्थसंकल्प चांगलाच वाढला आहे. या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात भारतामध्ये रस्त्यांचे जाळे ऊभा राहीले. या जाळ्याच्या माध्यमातून आम्ही आमचे उद्दीष्ट पूर्ण करु. अर्थसंकल्पात अनेक ठिकाणी ‘ग्रीन एनर्जी’, ‘ग्रीन पॉवर’ याबाबत उल्लेख आहे. आगामी काळात पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. (हेही वाचा, Cigarettes Costlier Funny Memes: सिगारेट प्रेमींना निर्मला सितारामन यांच्याकडून महागाईचा चटका; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस)

 

सर्वार्थाने सर्वहितय या संकल्पनेवर भर देणारा अर्थसंकल्प- फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वार्थाने सर्वहितय या संकल्पनेवर भर देणारा आहे. समाजातील तळागाळातील शेवटचा व्यक्ती केंद्रबिंदू ठेऊन सादर करण्यात आलेला हाअर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्याचा विचार केला आहे. हा अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सर्वांचे समाधान करतो.

अर्थसंकल्प केवळ आर्थिक बुडबुडा- जितेंद्र आव्हाड

बजेट म्हणजे देशाची दिशा दाखवणारं म्हणजे पुढच्या वर्षी आणि भविष्यात आपण काय करणार आहोत याची दिशा दाखवणारे वास्तव. अर्थसंकल्पातून बेरोजगारी, महागाई, जागतिक मंदी अशा घटकांवर काहीतरी भाष्य होईल अशी आशा होती. परंतू, ही निर्मल आशा धुळीस मिळवली गेली. त्यामुळे अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचे बुडबुडे दाखवण्यात आल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.