Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सुरु झालेल्या या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) द्वारा धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा या खटल्यात दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडते आहे. प्रदीर्घ काळापासून उत्सुकता लागून राहिलेल्या या याचिकेवर कोर्ट काय निर्णय देते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि ते सूरत मार्गे गुवाहाटीला गेले. नंतर पुढे गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले. आपल्या सोबत 40 आमदार असून त्यांचा पाठींबा पाहता पक्ष आपलाच आहे. त्यामुळे शिवेसना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आपल्यालाच मिळावे, असा दावा शिंदे गटाने केला. जो निवडणूक आयोगाने मान्य केला. त्यानंतर ठाकरे गट कोर्टात गेला. या याचिकेवरच आज सुनावणी पार पडत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या आधी दिलेल्या निकालामध्ये राजकीय पक्षांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने दिलेला निकाल हा तत्त्वांविरोधात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. परिणामी हा खटला आणखीच उत्कंटावर्धक झाला आहे. ज्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यामुळे सध्यास्थितीमध्ये हे नाव शिंदे गट वापरतो आहे.

ठाकरे गटाचे म्हणने आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा पूर्णपणे एकतर्फी आहे. सर्वोच्च न्यायालयाने योग्य निवाडा करुन हा निकाल फिवरवावा. आमदार फुटले याचा अर्थ पक्ष फुटला असा होत नाही, असे कोर्टानेच एका प्रकरणात म्हटले होते. इथेही तेच तत्व लागू हेते असा ठाकरे गटाचा दावा आहे. दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत आयागाने म्हटले होते की, सन 2018 मध्ये झालेल्या शिवसेना पक्षातील घटनेतील बदल आयोगाला कळविण्यात आला नाही.

दरम्यान, शिवसेना पक्षात जे घडले तेच आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. याही प्रकरणात अजित पवार यांनी 42 आमदारांचा आपल्यला पाठिंबा असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगात केला आहे.