कर्नाटकचे मख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री दररोज नवनवी विधाने करुन वाद निर्माण करत आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री मात्र त्यावर एक शब्द न बोलता मौन बाळगून आहेत. आमचे मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी आसामला कामाख्या मंदिरात जातात. परंतू, बेळगावच्या प्रश्नावर मात्र त्यांना नवस बोलावेसे वाटत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येक राज्यांमध्ये इतर राज्यांची भवनं असतात. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये अयोध्येतही महाराष्ट्र भवन असावे अशी घोषणा आम्ही केली होती. या घोषणेला जर या सरकारने स्थगिती दिली असेल तर त्याबाबत आपल्याला माहिती नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते काय आहे याबाबत ऐकायला आले नाही. ते (कर्नाटक) जर महाराष्ट्रात कर्नाटक भवन बांधत असतील तर , वृत्तपत्रात आजच मी वाचले की त्यांनी (कर्नाटक) सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात यायला मज्जाव केला आहे.मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे आम्ही ऐकले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Shekhar Gore: उद्धव ठाकरे यांनी साताऱ्यात मोहरा बदलला, शेखर गोरे यांच्याकडे मोठी जबाबदारी)
कर्नाटक वारंवार महाराष्ट्राची कळ काढत आहे. आताही त्यांनी आपल्या तलावात पाणी सोडले आहे. आणि आपले सत्ताधाीर त्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत. या नेभळटांविरुद्ध आपण ताठ मानेने उभा राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यपालांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राज्यपाल पद हे महत्त्वाचे पद आहे. त्याला एक प्रकारचा दर्जा आहे. त्यामुळे त्या पदावर बसणारी व्यक्तीही तितकीच दर्जेदार असायला पाहिजे. नाहीतर उगाचच केंद्र सरकारच्या मर्जीतला अथवा माझ्या-तुझ्या मर्जीतला व्यक्ती आहे म्हणून त्या पदावर कोणीतरी बिंडोक मनुष्य बसवायचे असेल तर त्या पदाचा मान राखला जाणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.