
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या होमपीचवर मोठी खेळी केली आहे. या खेळीमुळे एकाच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप पर्यायाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धोबीपछाड दिला आहे. सातारा जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाची खांदेपालट केली असून मोहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून आता शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे सातारा शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या आधी ही जबाबदारी नितीन बानगुडे पाटील यांच्याकडे होती. मात्र, आता ती शेखर गोरे यांच्याकडे दिली आहे. शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात नेहमीच मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या संघर्षाचा नवा अंक कसा रंगतो याबाबत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने ठाणे म्हणूनच ओळखले जाते. परंतू, कर्मभूमी ठाणे असली तरी सातारा ही एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे सातारा हे एकनाथ शिंदे यांचे होमपीच समजले जाते. त्यामुळे ठाण्यासोबत सातारा जिल्ह्यातही आपले वजन कायम राहावे अशी एकनाथ शिंदे यांची खेळी असते. दुसऱ्या बाजूला सादाऱ्यात भाजपची ताकद वाढावी अशी देवेंद्र फडणवीस यांची मनोमन इच्छा असते. सहाजिकच राज्यातील सत्तेचा फायदा घेत शिंदे आणि फडणवीस परस्परपूरक खेळी खेळणे सहाजिक. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हा संपर्क प्रमुखपदावर शेखर गोरे यांना संधी देत एकाच वेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांना खासदार प्रतापराव जाधव यांचे आव्हान, 'हिंमत असेल तर बुलढाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवा')
सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाला शह द्यायचा तर शेखर गोरे यांच्यासारखे तगडे व्यक्तीमत्व असायला हवे, अशी तळागाळातील शिवसैनिकांची मागणी होती. तळागाळातील शिवसैनिकांनी ही मागणी काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही या शिवसैनिकांची मागणी मान्य करत शेखर गोरे यांच्या निवडीला हिरवा कंदील दर्शवला. सातारा जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना अंगावर घेण्याची क्षमता शेखर गोरे बाळगून असतात. त्यामुळे तळागाळातील उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकाला तागद द्यायची तर शेखर गोरे यांना तागद दिली पाहिजे हे ओळखून ठाकरे यांनी ही निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.