MP Prataprao Jadhav's challenge to Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांना खासदार प्रतापराव जाधव यांचे आव्हान, 'हिंमत असेल तर बुलढाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवा'
Uddhav Thackeray and Prataprao Jadhav | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्यानंतर टीका करता करता एका खासदाराने आता चक्क उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर माझ्या विरोधात बुलढाणा (Buldhana Constituency) येथून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवून दाखवा, असे या खासदाराने म्हटले आहे. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) असे या खासदाराचे नाव आहे. प्रतापराव जाधव हे शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षासोबत गेले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नुकताच बुलढाणा येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध विषयांवरुन शिंदे गट आणि या गटातील आमदार, खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या वेळी या आमदार खासदारांचा गद्दार असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, या गद्दारांनी हिंमत असेल तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून दाखवावी. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचे बाण शिंदेगटातील अनेकांना जिव्हारी लागले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Bandh: भगतसिंग कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावरून वाद चिघळला; Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा विचार)

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देत टीकास्त्र सोडले आहे. प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे की, मी पुढची निवडणूक बुलढाण्यातूनच लढणार आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनीच बुलढाण्यातून निवडणूक लढवून दाखवावी. आम्ही भाजपकडून लढण्याचा विषयच येत नाही. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बाळासाहेबांचेच विचार पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच हिंमत दाखवून बुलढाण्यातून निवडणूक लढवून दाखवावी.

भाजप हा शिवसेनेचा जुना आणि नैसर्गिक मित्र आहे. या पक्षाला सोबत घेऊनच आम्ही या आधीच्या जवळपास सर्वच निवडणुका लढलो आहोत. त्यामुळे यापुढेही आम्ही सर्व निवडणुका भाजपला सोबत घेऊनच लढू, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, प्रतापराव जाधव हे शिवसेना खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सूरत मार्गे गुवाहाटी बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रतापराव जाधव हे शिवसेना जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे या पदावरुनही त्यांची उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करताना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका प्रतापराव जाधव यांच्यावर ठेवण्यात आला होता.