Uddhav Thackeray Solapur Visit: राज्य अडचणीत असताना जर केंद्र सरकारकडे मदत मागितली तर त्यात गैर काय? राज्यांना मदत करणं हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे पावसाने झालेले नुकसान (Maharashtra Rains Update) असो वा इतर कोणतेही संकट केंद्र सरकारकडे मदत मागण्यात काहीच गैर नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. दरम्यान, बिहारमध्ये निवडणूक प्रचार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत मागितली तर बरं होईल, असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा करुन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशिही संवाद साधला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज मी कोणतीही घोषणा करणार नाही. जे संकट आहे ते संकट टळू देत.त्यानंतर योग्य ती मदत केली जाईल. संकट असताना घाईगडबडीने काही जाहीर करणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Solapur Visit: राज्याचे पैसे केंद्राने वेळीच दिले तर मदत मागण्याची वेळच येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशणा)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन आपण महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे सांगितले आहे. जर पंतप्रधानांनी स्वत:हून मदतीचा हात पुढे केला असेल तर केंद्र सरकारकडून मदत घेण्यात किवा मागण्यात गैर काय आहे? असा सवाल करत विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजून ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत दिली जाईल. परंतू, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. नैसर्गिक संकटामध्ये मनुष्य हानी होणार नाही, याकडे सर्वात प्रथम लक्ष देणे गरजेचे आहे. पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर आवश्यक ती मदत जाहीर केली जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी सांगितले.