Eknath Shinde यांना नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री Uddhav  Thackeray यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली; शिंदे गटाकडून गंभीर आरोप
Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. सध्या शिवसंवाद दौर्‍यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) निवेदन देण्यासाठी स्थानिक आमदार सुहास कांदेंनी (Suhas Kande) तयारी दाखवली आहे मात्र या भेटीपूर्वी त्यांनी खळबळजनक आरोप केल्याने वातावरण तापलं आहे.

शिंदे गटाकडून सुहास कांदे आणि प्रवक्ता दीपक केसरकर यांनी केलेल्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून ठार मारण्याची धमकी आली होती तेव्हा शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना दिल्याचा दावा केला आहे. “एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? याउलट जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झे़ड प्लस सुरक्षा का देण्यात आली?”असा सवालही कांदेंनी विचारला आहे. आज उद्धव ठाकरेंवर हा आरोप केल्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नक्की वाचा: मनमाड मध्ये आज Aaditya Thackeray आणि शिंदे गटातील आमदार Suhas Kande आमने सामने; 'माझं काय चुकलं' म्हणत निवेदन देण्याच्या तयारीत .

दरम्यान दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दादा भुसे यांनी बोलताना हा मुद्दा कॅबिनेट मध्ये चर्चेत आला होता असं म्हटलं आहे. तर सतेज पाटील यांनी हा दावा फेटाळला आहे. सुरक्षेबाबत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हस्तक्षेप करत नाहीत, कांदेंच्या आरोपात तथ्य नाही असे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

आज आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद दौर्‍यातील दुसरा दिवस आहे. मनमाड मध्ये ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. सकाळी नाशिक मध्ये त्यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतले आहे. सुहास कांदे यांनी 'माझं काय चुकलं' असं विचारत हिंदुत्त्वापासून शिवसेना कशी दूर गेली याचा पाढा वाचणारं एक निवेदन आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी दाखवली आहे. मेळाव्यात भेट झाली नाही तर रस्तारोको आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी आपण विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढू असं म्हटलं आहे.