
एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेनेपासून वेगळे होत पक्षनेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उभं केल्यानंतर पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत आहे. आमदार, खासदार ते माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाची पुन्हा बांधणी करायला बाहेर पडलो आहे असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसंवाद यात्रा (Shiv Sanvad Yatra) घेऊन आज मनमाड मध्ये दाखल झाले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या मनमाड मधील दौर्यात स्थानिक आमदार सुहास कांदे त्यांची भेट घेणार आहे. सध्या सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही पूर्वीप्रमाणे आदरानेच आपण आदित्य ठाकरेंना भेटून एक निवेदन देणार आहोत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. 'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरुन शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख या निवेदनात असणार आहे. असे कांदे म्हणाले आहेत. सध्या नाशिक मध्ये 'माझं काय चुकलं' ची होर्डिंग्स देखील पहायला मिळत आहेत.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे मुंबई बाहेर जाऊन शिवसैनिकांची भेट घेत आहेत. भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी मध्ये 23 जुलै पर्यंत विविध ठिकाणी त्यांचे मेळावे होणार आहेत.
दरम्यान आज आदित्य ठाकरेंना भेटायला जाताना सुहास कांदे यांच्यासोबत दहा हजार समर्थक असणार आहेत. असा त्यांनी दावा केला आहे. मेळाव्यात भेटण्यास परवानगी दिली नाही तर रस्त्यावर उतरून रस्तारोको आंदोलन करून भेट घेऊ असेही कांदे म्हणाले आहेत.