Uddhav Thackeray | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हेलिकॉप्टरची आणि वैयक्तिक वस्तूंची निवडणूक आयोगाने ( Election Commission) मंगळवारी (12 नोव्हेंबर) लातूरच्या औसा मतदारसंघात सुरक्षा तपासणी केली. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करत असताना उद्धव ठाकरे यांची सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या चमूने हेलिपॅडवर तपासणी केली आहे. निवडणूक आयोगाचा सुरक्षा प्रोटोकॉल विचारात घेता, त्यामध्ये वाहतूक आणि वैयक्तिक वस्तूंची तपासणी समाविष्ट आहे. ही तपासणी म्हणजे निवडणूक काळात पारदर्शकता आणि आदर्श आचारसंहितेचे (Model Code of Conduct) पालन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची सोमवारी (11 नोव्हेंबर) पहिल्यांदा अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली होती.

'मोदी, शाह आणि शिंदे, फडणवीसांची बॅगही तपासा'

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगायच्या या कारवाईनंतर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डाकले आहे. निवडणूक आयोगाच्या तपासणीवर आपला कोणताही आक्षेप नाही. मात्र, सर्वांना समान न्याय लागू असवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील निवडणूक प्रचारादरम्यान महाराष्ट्रात येत असतात. तेव्हा त्यांच्याही हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर बड्या नेत्यांची अशाच प्रकारे तपासणी केली जात आहे का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे बॅग तपासली गेल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बोलत होते. (हेही वाचा, CM Eknath Shinde: कार्यकर्त्याने 'तो' शब्द उच्चारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले? काँग्रेस कार्यालयात जाऊन विचारला जाब)

ठाकरे यांची बॅग तपासताना अधिकारी

सलग दुसऱ्या दिवशीही हेलिकॉप्टर, बॅग्जची तपासणी

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर आणि बॅग्ज दोन वेळा तपासली गेली. या दोन्ही कारवायांच ठाकरे यांच्याकडून चित्रीकरण करण्यात आले आहे. या कारवायांवेळी ते अधिकाऱ्यांना त्यांचे नाव, गाव आणि इतर तपशील विचारताना दिसतात. एका व्हिडिओमध्ये ते सांगताना दिसतात की, "जेव्हा मी माझ्या मोहिमेसाठी आलो, तेव्हा सात अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. ज्यासाठी मी त्यांना परवानगी दिली. पण जर त्यांनी माझ्या बॅगा तपासल्या आहे. तर, इतर राजकीय नेत्यांच्या खास करुन सत्ताधाऱ्यांच्या बॅगाही अशाच पद्धतीने तपासण्याचे मी त्यांना अवाहन करतो. निवडणूक काळात लागू होणारे नियम सर्वांना सारखेच असावेत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.