संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून मोठा जल्लोष सुरु झाला. उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करुन संजय राऊत यांचे अभिनंदन केले आहे. संजय राऊत यांचे अभिनंदन करण्यासाठी थेट मातोश्रीवरुन फोन करण्यात आला होता. मात्र, संजय राऊत सध्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करता येत नाही. त्यामुळे कोर्ट परिसरात असलेल्या संजय सावंत नामक एका कार्यकर्त्याच्या फोनवर उद्धव ठाकरे यांनी फोन केला आणि 'संजयला अभिनंदन सांग' असे म्हटले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचा निरोप मिळाल्यानंतर संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांना धन्यवाद दिले आहेत. संजय राऊत यांना विशेष PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला. या जामीन प्रक्रियेला स्थगिती द्यावी आम्हाला उच्च न्यायालयात जायचे आहे, अशी मागणी ईडीने केली. मात्र कोर्टाने ईडीची याचिका फेटाळून लावली आहे. (हेही वाचा, Sanjay Raut Gets Bail: संजय राऊत यांचा जेल बाहेर पडण्याचा मार्ग अखेर मोकळा; PMLA कोर्टाने ED ची जामीन स्थगितीची मागणी फेटाळली)
दरम्यान, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात जामीन मिळाला. संजय राऊत यांना जामीन मिळू नये यासाठी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) जंग जंग पछाडले. परंतू, संजय राऊत यांच्या वकीलांनी कोर्टात केलेला युक्तीवाद सरस ठरला. परिणामी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोश केला. 'ढाण्या वाघ येतोय' असे म्हणत शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. महाविकासआघाडीमध्येही आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या जामीनावर आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले यांच्यासह वरुण सरदेसाई आणि तमाम शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.